इंडियन बॅडमिंटन लीगचे (आयबीएल) नाममुद्रा हक्क आणि व्यावसायिक भागीदार स्पोर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (एसएसपीएल) कंपनीने भारतीय बॅडमिंटन संघटनेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. बौद्धिक संपदा हक्काचे संरक्षण करण्यासाठी एसएसपीएलने ही याचिका दाखल केली आहे.

भारतीय बॅडमिंटन संघटनेने विपणन भागीदार एसएसपीएलसह २०१३मध्ये आयबीएलची स्थापना केली. मात्र गेली दोन वर्षे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. परंतु पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात ही स्पर्धा घेण्याची घोषणा संघटनेने केली. त्याच वेळी बॅडमिंटन संघटनेने ‘स्पोर्ट्स लाइव्ह’ या नव्या भागीदारासह आयबीएलच्या दुसऱ्या सत्राच्या आयोजनाचा घाट घातला आहे. त्यामुळे एसएसपीएलने न्यायालयात धाव घेतली. आयबीएलच्या पहिल्या सत्रात एसएसपीएलने फार मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली होती. त्यामुळे आपल्या बौद्धिक संपदा हक्काच्या संरक्षणासाठी एसएसपीएलने याचिका दाखल केली.

‘‘स्पोर्टी सोल्युशन प्रा. लि.च्या बौद्धिक संपदा हक्क संरक्षणासाठी आमच्या पक्षकारातर्फे आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आयबीएल ब्रँड बनवण्यासाठी पक्षकारांनी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या बँड्रच्या नावाचा, चिन्हाचा किंवा इतर कोणत्याही बौद्धिक संपदा हक्काचा वापर करण्यापासून इतर कुणालाही रोखण्यासाठी आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे,’’ अशी माहिती स्पोर्टी सोल्युशनचे सल्लागार संजीव कुमार यांनी दिली.

दोन वर्षांच्या खंडानंतर इंडियन बॅडमिंटन लीगचे दुसरे पर्व २ ते १७ जानेवारी २०१६ या कालावधीत होणार असल्याची घोषणा भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांनी केली.