सेरी-ए लीग फुटबॉल

अनुभवी खेळाडू झ्लाटन इब्राहिमोव्हिचने पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमावली असली तरी अखेरच्या मिनिटात गोल करत एसी मिलानचा पराभव टाळण्यात यश मिळवले.

भरपाई वेळेत (९०+३वे मिनिट) गोल केल्याने एसी मिलानला सेरी-ए लीग फुटबॉलमध्ये हेलास वेरोनाविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधता आली. या बरोबरीसोबतच एसी मिलानला दोन गुणांसह स्पर्धेत अग्रस्थान राखता आले आहे. यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा पेनल्टीवर गोल करण्यास ३९ वर्षीय इब्राहिमोव्हिच अपयशी ठरला. मात्र तरीदेखील त्याचे महत्त्व अजूनही कायम आहे, हे त्याने गोल साकारत सिद्ध केले.

रेयाल माद्रिदचा व्हॅलेन्सियाकडून पराभव

गतविजेता रेयाल माद्रिदला व्हॅलेन्सियाकडून १-४ असा पराभवाचा धक्का बसला. कार्लोस सोलेरचे पेनल्टीवर केलेले तीन गोल (३५वे, ५४वे आणि ६३वे मिनिट) व्हॅलेन्सियाच्या विजयात मोलाचे ठरले. ऑक्टोबर २०१८ नंतरचा हा रेयाल माद्रिदचा ला-लिगामधील दुसरा मोठा पराभव ठरला. करिम बेन्झेमाने २३व्या मिनिटालाच रेयाल माद्रिदचा १-० आघाडी मिळवून दिली होती. मात्र राफेल वरानेने ४३व्या मिनिटाला स्वयंगोल करत रेयाल माद्रिदला दडपणात आणले. या पराभवानंतरही रेयाल माद्रिद चौथ्या स्थानी कायम आहे.

अ‍ॅस्टन व्हिलाचा आर्सेनलला धक्का

लंडन : ऑली वॉटकिन्सच्या दोन गोलांमुळे अ‍ॅस्टन व्हिलाने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) आर्सेनलवर ३-० असा विजय मिळवला. आर्सेनलचा हा ‘ईपीएल’ हंगामातील आठ लढतींतील चौथा पराभव ठरला. वॉटकिन्सने ७२व्या आणि ७५व्या मिनिटाला असे झटपट दोन गोल करत विजयात योगदान दिले.