आयसीसीची २४ तास कार्यरत हॉटलाइन भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुखांची माहिती
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात पुरुष आणि महिलांचे एकंदर ५८ सामने होणार आहेत. ही स्पर्धा अविस्मरणीय अनुभूतींनी युक्त असेल, अशी मला आशा आहे. स्पध्रेच्या अखेरीस नेहमी क्रिकेट आणि ऐतिहासिक घटना यांची चर्चा होते, परंतु भ्रष्टाचाराची होत नाही. या प्रतिष्ठेच्या स्पध्रेत जर कोणत्याही खेळाडू किंवा अन्य व्यक्तीला भ्रष्टाचारासंदर्भात कोणी संपर्क साधल्यास त्याची तक्रार करण्यासाठी विशेष यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख सर रॉनी फ्लानगन यांनी सांगितले.
‘‘पाकिटात राहू शकेल, असे छोटेसे माहितीपुस्तक आम्ही सर्वाना वितरित केले आहे. यात २४ तास कार्यरत असा दुबई कार्यालयातील हॉटलाइन क्रमांकसुद्धा देण्यात आला आहे. गेल्या वर्षी ४५० तक्रारी आल्या होत्या आणि आम्ही त्या सर्व गंभीरपणे हाताळल्या होत्या,’’ अशी माहिती फ्लानगन यांनी दिली.
‘‘खेळाला कलंकित करणाऱ्या भ्रष्टाचाराच्या कारवाया रोखणे, हे आमचे महत्त्वाचे कार्य आहे. याकरिता खेळाडू, प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षकवर्ग, सामनाधिकारी, आदी मंडळींमध्ये जागृती निर्माण करण्यामध्ये आम्ही गुंतलो आहोत. कोणत्याही प्रकारची संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित भ्रष्टाचारविरोधी पथकाला कळवा. हे टाळल्यास आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेनुसार गुन्हा ठरेल,’’ असा इशारा फ्लानगन यांनी दिला.