आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संयुक्त अरब अमिरातीमधील प्रशिक्षक इरफान अन्सारी यांच्यावर १० वर्षांची बंदी घातली आहे. २०१७मध्ये पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदशी ‘भ्रष्ट इराद्यानेच’ संपर्क साधल्यामुळे ते दोषी सापडले आहेत.

‘आयसीसी’च्या लाचलुचपत प्रतिबंधक लवादासमोर झालेल्या सुनावणीत अन्सारी दोषी आढळले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधील स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या दोन संघांचे ते प्रशिक्षक असतानाही त्यांनी अशा प्रकारचे कृत्य दोनदा केले आहे. त्यामुळे एकंदर तीनदा त्यांनी नियमांचा भंग केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘‘सर्फराज अहमदने आपली नेतृत्वक्षमता आणि व्यावसायिकता दाखवताना त्वरित ‘आयसीसी’ला या घटनेची माहिती दिली. त्याने त्यांचा प्रस्ताव नाकारला आणि त्याची तक्रारसुद्धा दिली,’’ अशी माहिती ‘आयसीसी’ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महाव्यवस्थापक अ‍ॅलेक्स मार्शल यांनी दिली. सर्फराजने ‘आयसीसी’ची चौकशी आणि लवादाला साहाय्य केले.

ऑक्टोबर २०१७ मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे पाकिस्तानची श्रीलंकेविरुद्ध मालिका चालू असतना अन्सारी यांनी सर्फराजशी संपर्क साधला. भ्रष्ट मार्गाने महत्त्वाची माहिती घेण्याचा अन्सारी यांचा प्रयत्न सर्फराजने ओळखला. त्याने ‘आयसीसी’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्वरित संपर्क साधल्यामुळे हे प्रकरण प्रकाशात आले.

अन्सारी हे शारजा क्रिकेट परिषदेत गेली ३० वष्रे कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी शारजा क्रिकेट क्लबचे मुख्य प्रशिक्षकपदही भूषवले आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही अनुचित मार्गाना खपवून घेतले जाणार नाही, अशा प्रकारचा संदेश या निर्णयाद्वारे आयसीसीने दिला आहे.