पंच पुनर्आढावा प्रक्रियेबाबत (डीआरएस) पंचांनी चिंता प्रकट केल्यामुळे पायचीत निर्णयाच्या बदलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्यता दिली आहे. हा निर्णय गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये दोन विभाग करणे आणि नवी एकदिवसीय लीग आयोजित करणे अशा काही योजनांचे प्रस्ताव या वेळी चर्चेला आले.

शनिवारी रात्री आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत आयसीसी, आयडीआय व आयबीसी मंडळांच्या सदस्यांनी विविध विषय मांडले आणि काही निर्णय या वेळी घेण्यात आले.

नव्या नियमानुसार, पंचपुनर्आढावा प्रक्रियेत पायचीतच्या निर्णयाला आव्हान देताना किमान अर्धा चेंडू यष्टीसमान भागातून दिसणे आवश्यक आहे. याआधी उजव्या आणि डाव्या यष्टीच्या मध्यभागी अर्धा चेंडू यष्टीसमान भागात दिसणे गरजेचे होते. हा निर्णय गोलंदाजांच्या पथ्यावर पडणार आहे. मैदानावरील पंचांनी पायचीतचा कौल नाकारल्यानंतर पंचपुनर्आढावा प्रक्रियेनुसार दाद मागण्याचे प्रमाण त्यामुळे वाढणार आहे. याशिवाय मैदानावरील पंचांऐवजी तिसऱ्या पंचांनी नो-बॉलचा निर्णय देण्याबाबत येत्या काही महिन्यांत निर्णय घेण्यात येईल. आगामी एकदिवसीय मालिकेत हा प्रयोग करून पाहण्यात येईल.

कसोटी क्रिकेटसाठी नवे सूत्र

बांगलादेशसारख्या छोटय़ा राष्ट्रावर कसोटी क्रिकेटचा दर्जा कायमस्वरूपी जाण्याची टांगती तलवार आहे. या पाश्र्वभूमीवर कसोटी क्रिकेटसाठी नवे सूत्र करण्याबाबत चर्चा झाली. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी नव्या स्पर्धाचे प्रस्ताव या वेळी सादर करण्यात आले.

२०२२च्या राष्ट्रकुलमध्ये महिला क्रिकेट

दरबान येथे २०२२मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून याविषयीचे सादरीकरण करण्यात आले. याचप्रमाणे क्रिकेटला ऑलिम्पिक दर्जा प्राप्त व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी चर्चा करण्याचा प्रस्ताव या वेळी आला.

सौदी अरेबियाला आयसीसीचे सहसदस्यत्व

एडिनबर्गला झालेल्या बैठकीत रविवारी आयसीसीकडून ३९वे सहसदस्यत्व सौदी अरेबियाला बिनविरोध देण्यात आले. सौदी क्रिकेट केंद्राला (एससीसी) आयसीसीची २००३पासून मान्यता आहे. मात्र २०१४च्या जनगणनेनुसार या देशात ४३५० क्रिकेटपटू आणि ८० क्रिकेट मैदाने उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आयसीसीच्या मुख्य कार्यकारी पदावर डेव्ह रिचर्ड्सन आता २०१९च्या वार्षिक परिषदेपर्यंत कायम राहणार आहेत. आयसीसी मंडळाने या वेळी त्यांच्या कार्यकाळ वाढीला मंजुरी दिली.