12 July 2020

News Flash

ICC Awards 2019 : रोहित, विराटचा दबदबा!

धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांचा बोलबाला पाहायला मिळाला

| January 16, 2020 03:55 am

‘आयसीसी’चे पुरस्कार जाहीर; रोहित सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू, कोहलीला ‘खेळभावना’ पुरस्कार

दुबई : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स याने गेल्या वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान मिळवला असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या २०१९च्या पुरस्कारांमध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांचा बोलबाला पाहायला मिळाला. रोहितला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या तर विराटला ‘खेळभावना’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विराट कोहलीची आयसीसीच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवणाऱ्या चाहत्यांना रोखणाऱ्या या खिलाडीवृत्तीची आयसीसीने दखल घेतली असून त्याला हा खेळभावना पुरस्कार देण्यात आला आहे. चेंडूत फेरफार केल्याप्रकरणी एका वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर स्मिथने त्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते.

इंग्लंडचा विश्वचषक विजेता अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स याला या वर्षीच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा ‘सर गारफिल्ड सोबर्स करंडक’ देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याची या वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.

भारताचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याला ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबूशेन हा सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. स्कॉटलंडच्या कायले कोएट्झर याने संलग्न देशांमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे.

३२ वर्षीय रोहितने विश्वचषक स्पर्धेदरम्यान तुफान फटकेबाजी करताना नऊ सामन्यांमध्ये ८१.००च्या सरासरीने तब्बल ६४८ धावा केल्या होत्या. त्याच पाच शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. विश्वचषक स्पर्धेच्या एका पर्वात पाच शतके झळकावण्याचा मान मिळवणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला होता. रोहितने त्यानंतरही कामगिरीत सातत्य राखत २८ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४०९ धावा फटकावल्या.

२०१९मध्ये स्टोक्सने अप्रतिम कामगिरी करत इंग्लंडच्या अनेक विजयांत मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देण्यात स्टोक्सची खेळी महत्त्वपूर्ण ठरली होती. तसेच अ‍ॅशेस मालिकेतही स्टोक्सने जबरदस्त कामगिरी केली होती. ‘‘इंग्लंडच्या यशातील प्रत्येक टप्प्यात सहभागी असलेल्या सहकाऱ्यांची तसेच प्रशिक्षकांची कसोटी पाहण्याचे फळ म्हणजे हा पुरस्कार. प्रत्येकाच्या वैयक्तिक योगदानाशिवाय इंग्लंडला घवघवीत यश संपादन करता आलेच नसते,’’ असे स्टोक्सने सांगितले.

लबूशेन याने ११ कसोटी सामन्यांमध्ये ११०४ धावा करत उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत ११०व्या स्थानावर असलेल्या लबूशेनने वर्षअखेरीस चौथ्या स्थानापर्यंत मुसंडी मारली होती. इंग्लंडचे पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांना सर्वोत्तम पंचासाठीचा डेव्हिड शेफर्ड करंडक देण्यात येणार आहे.

आयसीसीच्या २०१९मधील पुरस्कारांचे मानकरी

* वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठीचा सर गारफिल्ड

सोबर्स करंडक – बेन स्टोक्स (इंग्लंड)

* सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू – पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)

* सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू – रोहित शर्मा (भारत)

* ट्वेन्टी-२० मधील सर्वोत्तम कामगिरी – दीपक चहर (भारत)

* सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू – मार्नस लबूशेन (ऑस्ट्रेलिया)

* संलग्न देशांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू – कायले कोएट्झर (स्कॉटलंड)

* खेळभावना पुरस्कार – विराट कोहली (भारत)

* सर्वोत्तम पंचासाठीचा डेव्हिड शेफर्ड करंडक – रिचर्ड इलिंगवर्थ

माझ्या कामगिरीची दखल घेतल्याने अभिमान वाटत आहे. भारतीय संघाने २०१९मध्ये केलेल्या कामगिरीमुळे मी आनंदी आहे. यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करता आली असती. पण काही चुकांमधून काही सकारात्मकतेने आम्ही पुढील वाटचाल करणार असून २०२०मध्ये अधिक चांगली कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे.

– रोहित शर्मा, भारताचा सलामीवीर

नागपूर येथील बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यांत अवघ्या सात धावा देऊन हॅट्ट्रिकसह सहा बळी मिळवल्यामुळेच माझी या पुरस्कारासाठी निवड झाली. माझ्यासाठी ती स्वप्नवत कामगिरी होती. तो क्षण सदैव माझ्या स्मरणात राहील.

– दीपक चहर, भारताचा गोलंदाज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2020 3:55 am

Web Title: icc awards 2019 rohit sharma odi cricketer of 2019 virat kohli get spirit of cricket award zws 70
Next Stories
1 कोहलीकडे कसोटी, एकदिवसीय संघाचे नेतृत्व
2 स्वत:ला सिद्ध करण्याच्या हेतूमुळेच कामगिरीत सुधारणा!
3 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : पूजा दानोळेला चौथे, 
Just Now!
X