ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात यावा, याबाबत गेले अनेक वर्षे चर्चा रंगलेली आहे. पण त्यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. पण आता २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये प्रेक्षकांना क्रिकेटचा थरार अनुभवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. क्रिकेटचा समावेश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामंध्ये करण्यात येण्याची शक्यता आता निर्माण झाली असून ICC ने यासाठी पुढाकार घेतला आहे.

२०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश व्हावा, यासाठी ICC जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी या संबंधीची माहिती दिली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या टी२० क्रिकेटचा समावेश होण्यासाठी ICC ने रितसर अर्ज दाखल केला असल्याचे ICC च्या अधिकृत ट्विटर हँडल वरून सांगण्यात आले आहे.

ICC ने हा अर्ज इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) यजमानपदाअंतर्गत केला आहे. या आधी १९९८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट खेळवण्यात आले होते. त्यात दक्षिण आफ्रिका संघ विजेता ठरला होता. ICC चा अर्ज मान्य झाल्यास २४ वर्षानंतर पुन्हा एकदा क्रिकेट हा खेळ राष्ट्रकुल स्पर्धेत दिसेल. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ICC ने हे पाऊल उचलले आहे. ”क्रिकेटला जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत त्याचा समावेश झाल्याने दोन्ही घटकांना त्याचा फायदा होईल आणि या पुढाकाराने महिला क्रिकेटलाही प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास रिचर्डसन यांनी व्यक्त केला आहे.