‘आयसीसी’ अध्यक्ष बार्कले यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ज्या हेतूने खेळवण्यात येत आहे तो अद्याप साध्य झाला नाही, असे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी दिले आहे.

करोना संसर्गामुळे पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. लॉर्ड्स येथे २०२१ जूनमध्ये या स्पर्धेची अंतिम लढत होणार आहे. मात्र त्यापूर्वी जर वेळापत्रकाप्रमाणे कसोटी खेळल्या गेल्या नाहीत तर गुणांचे विभाजन करून देण्याचा ‘आयसीसी’चा विचार आहे. ‘‘करोनामुळे जरी वेळापत्रकावर परिणाम झाला असला तरी स्पर्धेच्या नियोजनातील कमतरतादेखील यामुळे ठळक दिसली आहे. कसोटी क्रिकेटकडे मोठय़ा संख्येने प्रेक्षक वर्ग पुन्हा वळावा म्हणून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येण्याचा विचार चांगला आहे. मात्र त्याचे नियोजन अजून चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे. अजून या संकल्पनेचा मूळ हेतू साध्य झालेला नाही,’’ असे बार्कले यांनी सांगितले.

यापुढे पुन्हा या स्पर्धेचे आयोजन होण्याबाबत शंका उपस्थित करताना बार्कले म्हणाले की, ‘‘कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याचा मूळ हेतू जर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमुळे साध्य होत नसेल तर त्याचे पुन्हा आयोजन होणे कठीण आहे. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करायचे असेल तर त्यावर नियोजनाच्या दृष्टीने अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. क्रिकेटपटूंच्या व्यग्र वेळापत्रकाचा विचार करून या स्पर्धेच्या आयोजनाचा विचार करावा लागेल. क्रिकेटपटूंवरील दडपण वाढवून ही स्पर्धा खेळवता येणार नाही.’’

दोन देशांमधील क्रिकेटला आपल्या दृष्टीने महत्त्व असल्याचे बार्कले यांनी स्पष्ट केले. ‘‘मी वैयक्तिक स्तरावर आयसीसीच्या मोठय़ा विश्वचषकासारख्या स्पर्धाचे आयोजन करण्याकरिता मोठा चाहता आहे. मात्र आयसीसीच्या दृष्टीने दोन देशांमधील क्रिकेटला महत्त्व आहे. आयसीसी दोन देशांमधील मालिकेचे आयोजन करण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देते. आयसीसीच्या सर्व संलग्न देशांना दोन देशांमधील मालिका खेळण्याची संधी मिळते,’’ असे बार्कले यांनी स्पष्ट केले.

भारत जागतिक क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण

भारताच्या क्रिकेटचे म्हणजेच ‘बीसीसीआय’चे महत्त्व हे जगातील क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाला आहे, असे बार्कले यांनी मान्य केले. ‘‘भारत हा जागतिक क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. आयसीसीसाठीदेखील भारताचे क्रिकेट महत्त्वपूर्ण आहे. जर बीसीसीआय आणि आयसीसीमधील वादाचे काही विषय असतील तर ते लवकरच दूर करण्यात येतील,’’ असे बार्कले यांनी स्पष्ट केले.