स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरण असो किंवा कर्णधाराची चौकशी होणार असो, मैदानाबाहेरच्या कुठल्या घटनांचा आमच्यावर तिळमात्रही फरक पडत नाही, हे भारतीय संघाने अव्वल कामगिरी करत मंगळवारी दाखवून दिले. रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजचा अर्धा संघ गारद त्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे वेस्ट इंडिजला २३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवनने स्पर्धेतील सलग दुसरे तडफदार शतक लगावल्याने भारताने आठ विकेट्सने सहज सामना जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. बळींचा ‘पंच’ लगावणाऱ्या जडेजाला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
वेस्ट इंडिजचे आव्हान सध्याचा भारताच्या फलंदाजांचा फॉर्म पाहता माफक वाटत होते आणि तसेच घडलेही. रोहित शर्मा आणि धवन यांनी सलग दुसऱ्या सामन्याच शतकी सलामी देत संघाला दमदार सुरुवात करून दिली. रोहित चांगली फटकेबाजी करत असला तरी सुनील नरीनला ‘फ्लिक’ करण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. रोहितने ७ चौकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत सलग दुसरे शतक झळकावत यशस्वीरीत्या पेलली. शिखरने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद १०२ धावांची खेळी साकारली. धवन आणि दिनेश कार्तिक (नाबाद ५१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. तडाखेबंद सलामीवीर ख्रिस गेलला (२१) स्वस्तात भुवनेश्वर कुमारने तंबूत धाडत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर चार्ल्स आणि डॅरेन ब्राव्हो (३५) यांनी संघाला शतक ओलांडून देत संघाला सावरले. पण त्यानंतर १०३ धावसंख्येवर चार्ल्स बाद झाला आणि वेस्ट इंडिजची पडझड व्हायला सुरुवात झाली. १ बाद १०३ वरून त्यांची ४ बाद १०९ अशी अवस्था झाली. चार्ल्सने बाद होण्यापूर्वी ७ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ६० धावांची खेळी साकारली. त्यानंतरही ठरावीक फरकाने वेस्ट इंडिजचे फलंदाज बाद होत गेल्याने त्यांचा संघ दोनशे धावांचा टप्पा ओलांडणार नाही, असे वाटत होते. पण सॅमीने अखेरच्या फलंदाजाला साथीला घेत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ३५ चेंडूंत नाबाद ५६ धावांची खेळी साकारली आणि संघाला २३३ धावसंख्या उभारता आली. अखेरच्या विकेटसाठी सॅमी आणि केमार रोच (नाबाद ०) यांनी ५१ धावांची अभेद्य भागीदारी रचली, यामध्ये रोचच एकाही धावेचे योगदान नव्हते.
जडेजाने आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ३६ धावांमध्ये पाच बळी मिळवण्याची किमया साधली.
धावफलक
वेस्ट इंडिज : ख्रिस गेल झे. अश्विन गो. कुमार २१, जॉन्सन चार्ल्स पायचीत गो. जडेजा ६०, डॅरेन ब्राव्हो यष्टीचीत धोनी गो. अश्विन ३५, मालरेन सॅम्युअल्स पायचीत गो. जडेजा १, रामनरेश सारवान झे. धोनी गो. जडेजा १, ड्वेन ब्राव्हो झे. जडेजा गो. यादव २५, किरॉन पोलार्ड झे. कुमार गो. इशांत शर्मा २२, डॅरेन सॅमी नाबाद ५६, सुनील नरीन झे. कार्तिक गो. जडेजा २, रवी रामपॉल त्रि. गो. जडेजा २, केमार रोच नाबाद ०, अवांतर (बाइज ४, लेग बाइज २, वाइड २) ८, एकूण ५० षटकांत ९ बाद २३३.
बाद क्रम : १-२५, २-१०३, ३-१०५, ४-१०९, ५-१४०, ६-१६३, ७-१७१, ८-१७९, ९-१८२.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८-०-३२-१, उमेश यादव ९-०-५४-१, इशांत शर्मा १०-१-४३-१, आर. अश्विन ९-२-३६-१, विराट कोहली ४-०-२६-०,
रवींद्र जडेजा १०-२-३६- ५.
भारत : रोहित शर्मा झे. चार्ल्स गो. नरीन ५२, शिखर धवन नाबाद १०२, विराट कोहली त्रि. गो. नरीन २२, दिनेश कार्तिक नाबाद ५१, अवांतर (बाइज ४, वाइड ५) ९, एकूण ३९.१ षटकांत २ बाद २३६.
बाद क्रम : १-१०१, २-१२७.
गोलंदाजी : केमार रोच ६-०-४७-०, रवी रामपॉल ६-०-२८-०, सुनील नरीन १०-०-४९-२, डॅरेन सॅमी ४-०-२३-०, ड्वेन ब्राव्हो ५-०-३६-०, मालरेन सॅम्युअल्स ४-०-१७-०, ख्रिस गेल १-०-११-०, किरॉन पोलार्ड ३.१-०-२१-०.
सामनावीर : रवींद्र जडेजा.