भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात उद्या म्हणजेच रविवारी चॅम्पियन्स करंडकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. ओव्हलच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्याआधी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आलेली आहे. भारताच्या फिरकी गोलंदाजीचा प्रमुख कणा मानला जाणाऱ्या रविचंद्रन अश्विनचा गुडघा दुखावल्याचं समजतंय. मैदानात क्षेत्ररक्षणाच्या सरावादरम्यान अश्विनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. यानंतर संघाच्या फिजीओनी अश्विनवर त्वरित उपचार करायला सुरुवात केली आहे. मात्र अंतिम सामन्यात अश्विन खेळेल की नाही हे नेमकं समजू शकलेलं नाही.

संपूर्ण आयपीएलचा हंगाम विश्रांती घेतल्यानंतर अश्विनची चॅम्पियन्स करंडकाच्या संघात निवड झाली. मात्र सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने ३०० हून अधिक धावसंख्येचा टप्पा ओलांडला होता. मात्र गोलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे भारताला हा सामना गमवावा लागला होता. यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अश्विनचा संघात समावेश करण्यात आला होता. या सामन्यात अश्विनने चांगली गोलंदाजी केली होती.

आश्विनची दुखापत गंभीर असल्यास भारतीय संघासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. अश्विनच्या जागी उमेश यादवची संघात एंट्री होऊ शकते. मात्र प्राथमिक अहवालानूसार अश्विनची दुखापत फारशी गंभीर नसली तरीही त्याच्या सहभागावर अंतिम निर्णय उद्या घेण्यात येईल. त्यामुळे अश्विनची दुखापत फारशी गंभीर नसू दे आणि उद्याच्या सामन्यात त्याला खेळता येऊ दे अशी प्रार्थना सर्व भारतीय करत आहेत.