18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

कोहलीचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्यच -गिलख्रिस्ट

भारत पराभूत झाल्यावर कोहलीच्या या निर्णयावर भरपूर टीका झाली. पण कोहलीचा निर्णय योग्यच होता.

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: June 20, 2017 4:38 AM

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत पराभूत झाल्यावर कोहलीच्या या निर्णयावर भरपूर टीका झाली. पण कोहलीचा निर्णय योग्यच होता, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केले आहे.

‘अंतिम फेरीसाठीची खेळपट्टी बघितली तर ती पाटा होती. त्यामुळे या खेळपट्टीवर कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करणे शक्य होते. पहिली फलंदाजी करून तीनशे धावा केल्या असत्या तर त्याचाही सहज पाठलाग होऊ शकला असता,’ असे गिलख्रिस्ट म्हणाला.

कोहलीने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांनी फखर झमानच्या दमदार शतकाच्या जोरावर ३३८ धावांचा डोंगर रचला. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानने अंतिम सामना १८० धावांनी जिंकत जेतेपद पटकावले.

‘आतापर्यंत या स्पर्धेत बऱ्याचदा धावांचा यशस्वी पाठलाग पाहायला मिळाला आहे. भारतीय संघही धावांचा पाठलाग करण्यात तरबेज आहे. त्यामुळे कोहलीने धावांचा पाठलाग करण्याचा घेतलेला निर्णय हा योग्यच होता. पण या निर्णयानंतर त्याच्या मनासारखे घडले नाही. जर पाकिस्तानचा फखर झमान बाद झाला तो चेंडू नो बॉल नसता तर सामन्याचे रूप वेगळेच पाहायला मिळाले असते,’ असे गिलख्रिस्ट म्हणाला.

First Published on June 20, 2017 4:31 am

Web Title: icc champions trophy 2017 gilchrist support virat kohli india vs pakistan