इंग्लंडच्या रणभूमीवर ‘बाहुबली’ टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये ‘महायुद्ध’ होणार आहे. प्रत्यक्ष रणभूमीवर उतरण्याआधीच पाकिस्तान संघाचा सेनापती अर्थात कर्णधार सरफराज अहमदवर ‘मॅच फिक्सिंग’च्या संशयाचे काळे ढग दाटून आले आहेत. पाकिस्तानचा माजी खेळाडू आमिर सोहेलनं तसा संशय व्यक्त केला आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील icc champions trophy 2017 पहिल्या उपांत्य फेरीची लढत इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये झाली. त्यात पाकिस्ताननं जबरदस्त खेळ करून इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आणि फायनलमध्ये धडक दिली. आता पाकिस्तानची टक्कर बलाढ्य भारतीय संघासोबत होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील या फायनल लढतीआधीच पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद ‘मॅच फिक्सिंग’च्या फेऱ्यात सापडला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आमिर सोहेल यानं तसा संशय व्यक्त केला आहे. तू काहीही कमाल केली नाहीस. कुणीतरी तुम्हाला मॅच जिंकून दिली आहे. तू जास्त हुरळून जाऊ नकोस. काय घडलंय, काय घडतंय हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे, असं सोहेल म्हणाला आहे. सोहेलनं अशा प्रकारे संशय व्यक्त केल्यानं सरफराज संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे. सामना कुणी जिंकून दिला हे विचारू नका. ‘दुआ’ आणि ‘अल्ला-ताला’ने सामना जिंकून दिला आहे. सामना जिंकून देण्यात कुणाचा हात आहे, हे मी आता सांगणार नाही. यात तू काही कमाल केली नाहीस, हे सरफराजला सांगण्याची गरज आहे, असं म्हणून सोहेलनं पाकिस्तानी खेळाडूंच्या खेळावरच शंका उपस्थित केली आहे. तुमचं डोकं ठिकाणावर राहू द्या. डोक्यावर बसण्याची गरज नाही. तुमची पात्रता काय आहे, हे आम्हाला माहित आहे. तोंड बंद ठेवून तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही काही चुकीचं करत असाल तर ती चूक दाखवून देणं हे आमचं काम आहे. तुम्ही चांगलं कराल तर त्याचं कौतुकही आम्ही करू. तुम्ही चांगला खेळ करत आहात आणि तुमच्याकडून काही चूक होत असेल तर त्यावर आम्ही फार काही बोलणार नाही. तुमचं डोकं ठिकाणावर राहू द्या, असं सोहेलनं सरफराजसह पाकिस्तानी संघातील खेळाडूंना सुनावलं आहे.