पाकिस्तान संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद आमिर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे संकेत मिळत आहेत. भारताविरुद्धच्या मागील सामन्यातील पराभव विसरुन पाकिस्तान चॅम्पियन्स करंडकवर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे. स्पर्धेत चॅम्पियन्स ठरण्यासाठी पाकिस्तानला भारतीय संघातील फलंदाजीला सुरुंग लावण्याचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पाकिस्तानचे प्रमुख अस्र असणारा मोहम्मद आमिर दुखापतीतून सावरुन पुन्हा मैदानात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकला नव्हता. त्यामुळे उपांत्य सामन्यात आमिर ऐवजी रुमान रईस संधी मिळाली होती. मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने या सामन्यात ९ षटकात ४.४९ च्या सरासरीने ४४ धावा खर्च करुन दोन बळीही मिळवले होते. त्यामुळे आमिर परतल्यास पाकिस्तानच्या कोणत्या गोलंदाजाला बाहेर बसावे, लागणार यासंदर्भातील चित्र सामन्याच्या दिवशीच स्पष्ट होईल.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मोहम्मद आमिरकडे पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील अनुपस्थितीनंतर महत्त्वपूर्ण सामन्यात भारताविरुद्ध मैदानात उतरण्यासाठी त्याने लंडनमध्ये कसून सराव केल्याचे समजते. आपली तंदूरुस्ती सिद्ध करुन महत्त्वपूर्ण अशा अंतिम सामन्यात तो खेळण्याच्या तयारीत आहे. ओव्हलच्या मैदानावर तो पुन्हा एकदा पाकिस्तानसाठी दमदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल. मात्र, त्याच्या खेळण्याच्या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मोहम्मद आमिर पाकिस्तानचे प्रमुख गोलंदाज असला तरी त्याला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतला नावाला साजेशा खेळ करता आलेला नाही. साखळी फेरीतील तीन सामन्यात त्याने १३५ धावांच्या मोबदल्यात केवळ दोन बळी मिळवले आहेत. श्रीलंकेविरुद्ध त्याने १० षटकांमध्ये ५३ धावा देत दोन बळी मिळवले होते. या स्पर्धेत भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ८.१ षटकांच्या गोलंदाजीत ३.९२ च्या सरासरीने केवळ ३२ धावा दिल्या होत्या. यातील एक षटक त्याने निर्धाव टाकले. मात्र त्याला एकाही भारतीय फलंदाजाला बाद करण्यात यश मिळाले नाही. मात्र, तो पुन्हा संघात परतल्यास पाकिस्तानी संघासाठी नक्कीच फायदेशी असेल.