हशिम अमलाच्या रौप्यमहोत्सवी एकदिवसीय शतकाने रचलेल्या पायावर फिरकी गोलंदाज इम्रान ताहीरने कळस चढवला. त्यामुळे आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर ९६ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २९९ धावा उभारल्या. त्यानंतर श्रीलंकेने २ बाद ११६ अशी दमदार मजल मारल्यामुळे प्रारंभी  हे आव्हान तुटपुंजे वाटले. परंतु नंतर ताहीरच्या फिरकीपुढे श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. त्यामुळे ४१.३ षटकांत श्रीलंकेचा डाव २०३ धावांत आटोपला.

अमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५वे शतक झळकावणारा वेगवान फलंदाज ठरला आहे. त्याने १५१व्या डावात ही किमया साधताना विराट कोहलीचा (१६२व्या सामन्यात) विक्रम मोडीत काढला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन शतके नोंदवणाऱ्या ३४ वर्षीय अमलाने आपला तोच फॉर्म दाखवत सातत्याचा प्रत्यय घडवला आहे. ११५ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह १०३ धावा काढल्यानंतर अमला धावचीत होऊन माघारी परतला. अमलाने फॅफ डय़ू प्लेसिस (७० चेंडूंत ७५ धावा) सोबत दुसऱ्या विकेटसाठी १४५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

श्रीलंकेकडून निरोशान डिक्वेला (४१) आणि उपुल थरंगा (५७) यांनी ६९ धावांची सलामी दिली. मग फक्त कुशल परेराने नाबाद ४४ धावा काढताना एकाकी झुंज दिली. ताहीरने २७ धावांत ४ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ६ बाद २९९ (हशिम अमला १०३, फॅफ डय़ू प्लेसिस ७५, जे पी डय़ुमिनी नाबाद ३८; न्यूवान प्रदीप २/५४) विजयी वि. श्रीलंका : ४१.३ षटकांत सर्व बाद २०३ (उपुल थरंगा ५७, कुशल परेरा नाबाद ४४, निरोशान डिक्वेला ४१; इम्रान ताहीर ४/२७, ख्रिस मॉरिस २/३२)

सामनावीर : इम्रान ताहीर.