भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्यासोबतच्या वादाच्या चर्चेला आज, शनिवारी कर्णधार विराट कोहलीने पूर्णविराम दिला. कुंबळेसोबत कोणतेही मतभेद नाहीत, असे त्याने स्पष्ट केले. या मुद्द्याला मीडियाकडूनच ‘हवा’ दिली गेल्याचे तो म्हणाला.

चॅम्पियन्स ट्रॉफीत उद्या भारत – पाकिस्तान लढत होत आहे. त्यापूर्वी शनिवारी कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने कुंबळेसोबत कोणतेही वाद नसल्याचे स्पष्ट केले. कुंबळे आणि माझ्यातील वादाची चर्चा लोकांनीच सुरू केली आहे. खरे तर असे काही नाही, असे सांगून कोहलीने कुंबळेसोबत मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. लोक उगाचच हा मुद्दा उचलून धरत आहेत, असेही तो म्हणाला. दोन व्यक्तींची मते भिन्न असू शकतात. त्यात काहीच चुकीचे नाही, असे मला वाटते. आपल्या घरातील सदस्यांमध्येही एकाच गोष्टीवर एकमत होत नाही, मग आपण त्याला मतभेद असल्याचे म्हणू शकत नाही, असेही तो म्हणाला. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयकडून मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्याविषयी त्याने भाष्य केले. कोणतीही प्रक्रिया सुरू झाली की, लोक तर्क लढवायला सुरुवात करतात. गेल्या वेळीही असेच झाले होते. लोक आपल्या मर्जीने त्यावर लिहायला सुरूवात करतात. पण नंतर ते चुकीचे ठरतात, पण माफीही मागत नाहीत, असे म्हणत त्याने मीडियावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

दरम्यान, कर्णधार कोहली आणि कुंबळे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली यानेही प्रशिक्षकाबाबतचे मत जाणून घेण्यासाठी खेळाडूंशी चर्चाही केली होती, असेही बोलले जाते. पण त्यानंतर गांगुलीने या वृत्ताचे खंडन केले होते. यावेळी कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचेही कौतुक केले. धोनीचा सल्ला संघासाठी खूपच महत्त्वाचा असतो. त्याच्याकडून सल्ले घेतच राहणार असून तो किरकोळ पण महत्त्वाच्या गोष्टींवर अधिक लक्ष देतो, असे त्याने सांगितले. पाकिस्तानसोबतच्या लढतीविषयीही त्याने आपले मत मांडले. आम्ही पाकिस्तानसोबत खूप कमी सामने खेळतो. त्यांना कमी लेखून चालणार नाही. आम्हीही सर्वोत्तम खेळ करू, असेही तो म्हणाला. पाकिस्तानसोबत खेळणार असलो तरी कोणताही दबाव नाही, असे त्याने सांगितले.