भारतात क्रिकेटसोडून इतर खेळांकडे होणारं दुर्लक्ष ही काही नवीन बाब राहिलेली नाही. त्यातच क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या एका निर्णयामुळे सरकारची हॉकी या खेळाविषयीची दुरावस्था समोर आली आहे. सध्या भारताचे क्रिकेट आणि हॉकीचे संघ इंग्लंडमध्ये आहेत. त्यातच उद्या क्रिकेट आणि हॉकी या दोन्ही संघांचा पाकिस्तानसोबत सामना होणार आहे.

क्रीडा मंत्रालयाने दिल्लीतील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयममध्ये लोकांना सामने पाहता यावे याकरता एलईडी स्क्रीन्स बसवल्या आहेत. मात्र या स्क्रीन्सवर रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान हॉकी नाही तर क्रिकेटचा सामना प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शनिवारी भारत विरुद्ध कॅनडा हॉकी सामन्याचं प्रक्षेपण या एलईडी स्क्रीन्सवर करण्यात आलं होतं. मात्र भारत-पाकिस्तानच्या सामन्याला फाटा देऊन क्रिकेटच्या सामन्याला महत्व देण्यात येतंय, याचं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

भारताच्या माजी हॉकीपटूंनी सरकारच्या या निर्णयावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. क्रीडा मंत्रालयाने क्रिकेटच्या प्रसारासाठी हॉकीचं स्टेडियम वापरणं चुकीचं असल्याची भावना माजी ऑलिम्पियन झफर इक्बाल यांनी व्यक्त केली आहे.

चॅम्पियन्स करंडकात उद्या भारत-पाकिस्तानचा सामना होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात २-२ सामने जिंकले आहेत. मात्र हॉकीत विजयांची तुलना करायला गेल्यास भारताच्या तुलनेस पाकिस्तान अधिक सरस आहे. त्यामुळे उद्या क्रिकेटसोबत हॉकीच्या सामन्यालाही तितकचं महत्व देणं अपेक्षित आहे. त्यामुळे क्रिडा मंत्रालय यावर नेमका काय निर्णय घेणार हे पहावं लागेल.