उपांत्य फेरीत त्यांचा पोहोचण्याचा निर्धार तर होताच, पण त्याचबरोबर त्याला त्यांनी जोड दिली ती गुणवत्तेच्या जोरावर दर्जेदार कामगिरीची. अडीचशेची वेस ओलांडून ऑस्ट्रेलियाची मधली फळी गारद केल्यावर विजय त्यांना दृष्टिपथात दिसत होता, पण त्यावर शिक्कामोर्तब करताना मात्र त्यांच्या नाकी नऊ आले. ८ बाद १६८ अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था असताना त्यांना जास्तीत जास्त दोनशे धावांमध्ये गुंडाळून विजय मिळवता येण्याचे मनसुबे श्रीलंकेने आखले होते, परंतु त्याला सुरुंग लावला तो ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फळीने. अखेर मोठय़ा विजयाची अपेक्षा असलेल्या श्रीलंकेने नाममात्र २० धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांची गाठ एकही सामना पराभूत न झालेल्या भारतीय संघाशी होणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना महेला जयवर्धनेने ११ हजार धावांचा टप्पा ओलांडत नाबाद ८४ धावांची खेळी साकारल्यामुळे श्रीलंकेला ऑस्ट्रेलियापुढे २५४ धावांचे आव्हान ठेवता आले. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने २९.१ षटकांत केले असते तर त्यांना उपांत्य फेरीत जाता आले असते. बिनीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे त्यांची ८ बाद १६८ अशी अवस्था झाली. परंतु त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी झुंजार फलंदाजी केली. अ‍ॅडम व्होग्स (४९), क्लिंट मकाय (३०) आणि झेव्हियर डोहर्टी (१५) यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिसे काढत त्यांच्या नाकी नऊ आणले होते. व्होग्सला हेराथने बाद केल्यावरही मकाय आणि डोहर्टी यांनी अखेरच्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचत श्रीलंकेच्या तोंडून विजयाचा घास हिरावण्याचे प्रयत्न केले, पण अखेर कामचलाऊ गोलंदाज तिलकरत्ने दिलशानने मकायला बाद केले आणि श्रीलंकेने सुटकेचा नि:श्वास सोडला.
भारताला पराभूत करायला उत्सुक- जयवर्धने
लंडन : ‘‘प्रत्येक सामना जिंकण्यासाठी मी आतुर असतो. त्यामुळे आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो आहोत. अंतिम फेरीत याचा काहीही फरक माझ्यावर पडत नाही. उपांत्य फेरीत आमची गाठ भारताशी पडणार आहे. सराव सामन्यांमध्ये त्यांनी आम्हाला पराभूत केले असले तरी त्याचा कोणताही परिणाम या सामन्यावर होणार नाही. ही मोठी स्पर्धा असून भारताला उपांत्य फेरीत पराभूत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’’ श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने सांगितले.
सराव सामन्यात भारताने श्रीलंकेचे ३३३ धावांचे आव्हान पाच बळी गमावून सहज गाठले होते. तर २००२ साली या दोन्ही देशांमधील चॅम्पियन्स करंडकाची अंतिम फेरी पावसामुळे होऊ शकली नव्हती. त्या वेळी या दोन्ही संघांना विजेतेपद विभागून दिले होते.