आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCने क्रिकेटमधील नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. लंडनमध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत नियमातील बदलाचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही वर्षातील क्रिकेटमधील घटनांचा अभ्यास करून आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. एक ऑगस्ट २०१९ पासून नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमाची सुरुवात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेपासून होणार आहे. बदली खेळाडूला फलंदाजी आणि गोलंदाजी करता येईल आणि षटकांची गती कमी राखल्यामुळे आता संपूर्ण संघातील खेळाडूंना दंड आकारण्यात येणार आहे.

अनेक वेळा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघांना कमी खेळाडूंसह सामना खेळावा लागला आहे. सामन्यादरम्यान एखादा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघाच्या कामगिरीवर देखील परिणाम होतो. म्हणूनच यापुढे बदली खेळाडू फळंदाजी आणि गोलंदाजी करू शकणार आहे. यापूर्वी बदली खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण करत असे.

षटकांची गती धिमी राखल्याबद्दल यापुढे आंतरराष्ट्रीय कर्णधारांना बंदीला सामोरे जावे लागणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या नियमांत बदल केला असून, आता अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास, कर्णधाराऐवजी संपूर्ण संघाला ही शिक्षा भोगावी लागणार आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीने सुचवलेली ही शिफारस आयसीसीने मान्य केली आहे. १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपासून हा नवा नियम लागू होईल. ‘‘कर्णधारांकडून वारंवार या नियमांचे उल्लंघन होत असले, तरी त्यांच्यावर आता बंदी लादली जाणार नाही. षटकांची गती धिमी राखल्याबद्दल संघातील सर्व खेळाडूंना सारखेच जबाबदार धरण्यात येईल. कर्णधारासह सर्वानाच समान शिक्षा सुनावण्यात येईल,’’ असे आयसीसीच्या पत्रकात म्हटले आहे.