जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बीसीसीसीआय सह बहुतांश क्रिकेट बोर्डांनाही बसला. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. त्यामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने खेळाडूंना सराव करण्यासाठी नियमावली आखून दिली. याव्यतिरीक्त अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रादूर्भाव टाळण्यासाठी गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर न करण्याची शिफारस केली होती. आयसीसीने ही शिफारस मान्यही केली. मात्र अनेक आजी-माजी खेळाडूंनी यावर नकारात्मक प्रतिक्रीया नोंदवल्या. यानंतर आयसीसीने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

बदली खेळाडू आणि लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यासाठी मनाई हे नियम तात्पुरते असल्याचं आसीसीने स्पष्ट केलं आहे. कसोटी सामन्यात एखाद्या खेळाडूला करोनाची लक्षणं आढळत असतील तर त्याच्या जागेवर संघाला बदली खेळाडू खेळवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र यासाठी सामनाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांची संमती घेणं गरजेचं असल्याचं आयसीसीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये बदली खेळाडूचा नियम लागू होणार नाही हे देखील आयसीसीने स्पष्ट केलं आहे.

गोलंदाजांना सामन्यादरम्यान चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्याची मनाई आहे. एखाद्या खेळाडूने असं केल्यास पंच त्याला समज देऊ शकतात. एका संघाला पंच किमान दोन वेळा समज देऊ शकतात. परंतू एखाद्या खेळाडूकडून वारंवार हा प्रकार होत असेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दंड म्हणून प्रतिस्पर्धी संघाला ५ धावा बहाल करण्यात येतील. तसेच थुंकीचा वापर झाल्यास चेंडू स्वच्छ करवून घेण्याची जबाबदारीही पंचावर राहणार आहे. हे सर्व नियम तात्पुरते असल्याचंही आयसीसीने म्हटलंय.