जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी आयसीसीने आनंदाची बातमी आणलेली आहे. कारण आगामी ३ वर्षांत क्रिकेटप्रेमींना ३ विश्वचषकांचा थरार अनुभवता येणार आहे. कोलकाता येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत, २०२१ साली भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संरचनेत महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. भारतात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आता ५० षटकांऐवजी टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे. आयसीसीचे मुख्य अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सर्व संलग्न देशांनी या बदलाला मान्यता दिल्याचं सांगितलं आहे. याचसोबत २०२१ साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत ८ ऐवजी १६ संघ सहभागी होणार असल्याचं कळतंय.

त्यामुळे आयसीसीने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार आता २०२० साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर क्रिकेटप्रेमींना २०२१ साली भारतात टी-२० विश्वचषकाचा आस्वाद घेता येणार आहे. याचसोबत २०१९ साली इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषकाचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे येणारी ३ वर्ष क्री़डाप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी असणार आहे.