१९७५च्या विश्वचषकात निव्वळ हजेरी लावणारा संघ अशी भारताची ख्याती होती. परंतु कालांतराने भारताने दोनदा विश्वचषक जिंकला. मागील विश्वचषकात उपांत्य फेरीतपर्यंत मजल मारणाऱ्या भारताला यंदासुद्धा संभाव्य विश्वविजेत्यांच्या पंक्तीत स्थान आहे.

१९८३च्या विश्वविजेतेपदानेच भारतात क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थाने रुजला, नव्हे जीवनाचा अविभाज्य भाग झाला. कपिल देव या ऐतिहासिक यशाचा शिल्पकार होता. कलात्मक आणि पाठय़पुस्तकी क्रिकेटला तिलांजली देत कपिलने आपल्या मुक्तछंदी फटकेबाजी आणि हुकमी स्विंग गोलंदाजीने भारताला सुवर्णकाळ दाखवला. सुनील गावस्करने आपल्या फलंदाजीची सर्वाना मोहिनी घातली. भारतीय क्रिकेटची हीच ज्योत मग सचिन तेंडुलकरने जवळपास २४ वष्रे वाहिली. सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनीही गेल्या दशकात आपले योगदान दिले. त्यामुळेच भारतीय संघ २००३मध्ये अंतिम फेरी गाठू शकला. मग २०११मध्ये घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात खेळताना भारताने अब्जावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद काबीज करीत सचिनचे स्वप्न साकारले. त्यानंतर आता आठ वर्षांनी पुन्हा विश्वविजेतेपद भारताला साद घालत आहे.

इतिहास

  • १९७५ : एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात संथ खेळी सुनील गावस्करने (१७४ चेंडूत ३६ धावा) पहिल्याच सामन्यात नोंदवली. डेनिस अमिसच्या १३७ धावांच्या बळावर इंग्लंडने ४ बाद ३३४ धावा उभारल्या. परंतु भारताने ६० षटकांत फक्त ३ बाद १२३ धावा केल्या. मग भारताने दुबळ्या ईस्ट आफ्रिकेवर विजय मिळवला. पण न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले.
  • १९७९ : भारताची साखळीतच पाटी कोरी राहिली. विश्वविजेत्या वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंकेने भारताला सहज हरवले. या स्पर्धेत भारताला एकाही सामन्यात दोनशेचा टप्पा ओलांडता आला नव्हता.
  • १९८७ : अ-गटात भारताने सहापैकी पाच सामने जिंकले, तर एक सामना एका धावेने गमावला. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात चेतन शर्माने ऐतिहासिक हॅट्ट्रिक नोंदवली, तर त्याच सामन्यात गावस्करला आपले पहिले एकदिवसीय शतक साकारता आले. गावस्करच्या कारकीर्दीतील हा अखेरचा विश्वचषक होता. परंतु उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचे स्वप्न धुळीस मिळवले.
  • १९९२ : भारताने पाकिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन संघांविरुद्ध सामने जिंकले, तर पाच सामने गमावले. त्यामुळे साखळीत सातव्या क्रमांकावर भारताची घसरण झाली.
  • १९९६ : गटसाखळीत भारताने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करले, तर विंडीज, झिम्बाब्वे, केनियाला पराभूत करीत आगेकूच केली. उपांत्यपूर्व सामन्यात सिद्धूच्या ९३ धावांमुळे भारताने पाकिस्तानला हरवले. या पराभवाचे पाकिस्तानमध्ये मोठे पडसाद उमटले. मग उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध भारताची ८ बाद १२० अशी केविलवाणी अवस्था झाली असताना क्रिकेटरसिकांनी हुल्लडबाजी करीत सामना थांबवला. या सामन्यात श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. सचिनने या स्पर्धेत ८७.१६च्या सरासरीने ५२३ धावा केल्या.
  • १९९९ : भारताचा दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेकडून पराभव झाला. मग वडिलांच्या निधनामुळे मायदेशी परतलेला सचिन विश्वचषकासाठी पुन्हा इंग्लंडला पोहोचला. केनियाविरुद्ध १४० धावांची खेळी त्याने वडिलांना समर्पित करीत भारताला विजयाचा मार्ग दाखवला. मग भारताने श्रीलंका आणि इंग्लंडला हरवून ‘सुपर सिक्स’मध्ये स्थान मिळवले. कारगीलमध्ये युद्धजन्य परिस्थिती चालू असताना भारताने मँचेस्टर येथे पाकिस्तानला ४७ धावांनी पराभूत केले. पण अन्य सामन्यांतील खराब कामगिरीमुळे भारताचे आव्हान ‘सुपर सिक्स’मध्ये संपुष्टात आले.
  • २००३ : भारताने ११ पैकी फक्त दोन सामने गमावले आणि ते दोन्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा डाव १२५ धावांत आटोपल्यावर संघाच्या ढासळत्या कामगिरीवर जोरदार टीका झाली. खेळाडूंच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. त्यानंतर भारताने झिम्बाब्वे, नाम्बिया, इंग्लंड आणि पाकिस्तानला हरवून दिमाखात ‘सुपर सिक्स’मध्ये स्थान मिळवले. मग भारताने केनिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडवर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. नंतर केनियाला आरामात हरवून भारताने अंतिम फेरी गाठली. रिकी पाँटिंगच्या घणाघाती शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ३६० धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु भारताचा डाव २३४ धावांत आटोपला आणि जगज्जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळाले.
  • २००७ : कॅरेबियन बेटांवरील हे एक दु:स्वप्न होते. पहिल्याच सामन्यात बांगलादेशने हरवल्यामुळे भारतीय संघाला खडबडून जाग आली. मग नवख्या बम्र्युडाविरुद्ध भारताने ५ बाद ४१३ धावांचा डोंगर उभारून सहज विजय मिळवला. मग गटातील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध हार पत्करल्यामुळे भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. या विश्वचषकाचे तीव्र पडसाद भारतात उमटले. काही खेळाडूंच्या घरांवर हल्ले आणि निदर्शने झाली. कुंबळेने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला, तर प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी पदत्याग केला.
  • २०१५ : भारताने पाकिस्तानला हरवून विश्वचषक अभियानाला प्रारंभ केला. मग सहापैकी सहा सामने जिंकत गटविजेत्याच्या थाटात आगेकूच केली. उपांत्यपूर्व सामन्यात रोहित शर्माच्या शतकामुळे भारताने बांगलादेशला नामोहरम केले. परंतु पंचांच्या खराब निर्णयांमुळे हा सामना गाजला. मग उपांत्य सामन्यात स्टीव्ह स्मिथच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारतावर ९५ धावांनी आरामात विजय मिळवला.
  • १९८३ : कपिलने लॉर्ड्सच्या गॅलरीत भारताचे जगज्जेतेपद उंचावून समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. साखळीत झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळायचे होते. भारताने यशपाल शर्माच्या खेळीच्या बळावर सलामीला विंडीजला हरवून क्रिकेटजगताला धक्का दिला. मग भारताने झिम्बाब्वेवर हरवले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि विंडीजला नमवले. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताची ५ बाद १७ अशी केविलवाणी अवस्था झाली असताना कपिलने १३८ चेंडूंत १६ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १७५ वादळी खेळी साकारली. नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळीतील अखेरचा सामना ११८ धावांनी जिंकून भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीत यशपाल, मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडवर सहा गडी राखून विजय मिळवला. मग अंतिम सामन्यात विंडीजने भारताचा डाव फक्त १८३ धावांत गुंडाळला. मग भारतीय गोलंदाजांनी दोन वेळा जगज्जेत्या विंडीची ६ बाद ७६ अशी अवस्था केली आणि नंतर फक्त १४० धावांत त्यांचा डाव कोसळला. अमरनाथने २६ धावा आणि १२ धावांत ३ बळी असे अष्टपैलूत्व सिद्ध केले.

अपेक्षित कामगिरी

विश्वचषकात पाकिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या भारताला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड या संघांचा सामना करणे आव्हानात्मक ठरते. पण भारतीय संघ यंदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकेल. परंतु २०१९ वर्षांचा पूर्वार्ध भारताचा आत्मविश्वास उंचावणारा ठरला आहे. भारताने १३ पैकी ८ सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या

देशात २-१ अशी धूळ चारली, तर न्यूझीलंडला ४-१ असे नमवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताने २-३ अशी गमावली.

बलस्थाने आणि कच्चे दुवे

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्याची क्षमता आहे. ‘आयपीएल’मधील भारतीय खेळाडूंची कामगिरी त्यासाठी पूरक अशीच आहे. धडाकेबाज फलंदाज कोहली, कठीण स्थितीत शांतपणे व्यूहरचना आखणारा महेंद्रसिंह धोनी, अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी करणारा जसप्रीत बुमरा आणि सामन्याला कलाटणी देणारा हार्दिक पंडय़ा ही भारताची बलस्थाने आहेत.

२०११ : सहयजमान भारताने विश्वविजेतेपदावर दुसऱ्यांदा नाव कोरले. युवराजने ३६२ धावा आणि १५ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करीत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. ब-गटात स्थान असलेल्या भारताने सहापैकी चार सामने जिंकले. इंग्लंडविरुद्धचा सामना ‘टाय’ झाला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला. मग उपांत्यपूर्व लढतीत भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. मोहालीला झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. वहाब रियाझ (५/४६) टिच्चून गोलंदाजी करीत असतानाही सचिनची (८५) खेळी भारताच्या विजयात महत्त्वाची ठरली. मग २ एप्रिल २०११ या दिवशी भारताने श्रीलंकेला हरवून विजेतेपद प्राप्त केले. महेला जयवर्धनेच्या शतकाच्या बळावर लंकेने ६ बाद २७४ धावांचे आव्हान उभारले होते. सेहवाग, सचिन झटपट तंबूत परतल्यामुळे भारताची २ बाद ३१ अशी अवस्था झाली. परंतु गंभीर आणि धोनीच्या जबाबदारीपूर्ण खेळींच्या बळावर भारताने श्रीलंकेचे लक्ष्य काबीज केले. सचिनने (४८२) स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक नोंदवल्या. झहीरने (२१) स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवले.