|| गौरव जोशी

इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट हा शब्द आपल्याला खूप वेळा ऐकायला मिळतो. ग्लुस्टरशायर, ईसेक्स, ससेक्स हे येथील नामांकित काऊंटी क्लब आहेत; पण गंमत अशी आहे की, इंग्लंड हा काही फार मोठा देश नाही. ब्रिस्टलपासून नॉटिंगहॅम हे २०० मैलांचे अंतर पार करताना चार काऊंटी ओलांडल्या. ग्लुस्टरशायर, नॉर्दम्पटन, सॉमरसेट आणि वूस्टरशायर. हे काऊंटी क्लब सारखे जरी वाटले तरी त्यांच्यात थोडेफार वेगळेपण आहे.

नॉर्दम्पटनचे वेगळेपण म्हणजे तेथील क्रिकेटपटू. जो दक्षिण आफ्रिकेतून इंग्लंडमध्ये आला तो म्हणजे अ‍ॅलन लॅम्ब. त्याला भेटल्यावर १९९२च्या विश्वचषकाच्या आठवणी ताज्या झाल्या. त्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वासिम अक्रमने अफलातून यॉर्करवर लॅम्बला बाद केले होते. त्याच वेळी तो सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकला होता. त्यावर त्याला विचारले की तो सांगतो, ‘‘तो चेंडूच फार अप्रतिम होता!’’ लॅम्बने त्यानंतर नॉर्दम्पटनशायरचा किस्सा सांगितला. लॅम्ब म्हणाला, ‘‘त्याच्या काऊंटी क्लबसाठी एखादा चांगला फिरकीपटू हवाय, असे सुनील गावस्कर, कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीनला सांगितले. त्यावर अझरने त्याला नवख्या अनिल कुंबळेचा पर्याय सांगितला. तो नवीन फिरकीपटू अत्यंत चांगला आहे. कुंबळे हा चेंडू अत्यंत कमी फिरवतो, तेच त्याचे वैशिष्टय़ असून तिथेच फलंदाज फसतील. एप्रिलच्या पहिल्या सामन्यावेळी प्रचंड थंडी होती. त्या वेळी पाच-सहा अंश सेल्सिअसच्या आसपास थंडी होती. कुंबळेने खूप स्वेटर्स वगैरे घालून गोलंदाजी केली. त्या वेळी पहिल्या सामन्यात कुंबळेने जवळपास १० षटकांत ५५ धावा देऊन एकही बळी मिळवला नव्हता. त्यामुळे नॉर्दम्पटन काऊंटीच्या अध्यक्षाने लॅम्बला विचारणा केली की, हा तुझा निर्णय नक्की बरोबर आहे, असे तुला वाटतंय ना? त्यामुळे लॅम्ब त्याला पुढच्या सामन्यापूर्वी मार्क्‍स अ‍ॅन्ड स्पेन्सरच्या दुकानात घेऊन गेला आणि त्याला अत्यंत चांगल्या दर्जाचे इनर्स, स्वेटर्स घेऊन देत त्याला म्हणालाा की, आता तुला थंडी वाजणार नाही; पण आता तू बळी मिळवून दाखव. त्यानंतर खरोखरच चमत्कार घडला. कुंबळेने नॉर्दम्पटनसाठी विक्रमी गोलंदाजी केली. त्याने त्या हंगामात १००हून अधिक बळी घेऊन दाखवले. नॉर्दम्पटनशायरचा हा विक्रम अद्यापही अबाधित आहे.’’

नॉर्दम्पटनशायरप्रमाणेच पुढे गेल्यावर वूस्टरशायरचेही वेगळेपण आहे. या मैदानाच्या लगत २०० वर्षांपूर्वीचे अप्रतिम मोठे चर्च आणि लगतच नदीचा किनारादेखील आहे. जर खूप पाऊस झाला तर त्या नदीला पूर येतो. तो पूर २०१० मध्ये या क्रिकेटच्या मैदानापर्यंत आला होता. इथेच झहीर खान २००६ मध्ये खेळायला आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठा गोलंदाज म्हणून नावारूपाला आला. वूस्टरशायरला खेळल्यानंतरच त्याच्या गोलंदाजीत आमूलाग्र बदल झाला होता. या मैदानावरच स्टीव्हन स्मिथ, रविचंद्रन अश्विन, आंद्रे रसेल यांच्यासारखे खेळाडूदेखील खेळले. जे आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळले, त्यांची नावेदेखील इथे नमूद केलेली आहेत. इयान बोथमदेखील त्याचा अखेरचा सामना या मैदानावर खेळला. सर्व काऊंटी क्रिकेटला इंग्लंडमध्ये खूप मानाचे स्थान असून तिथे जाऊन हे सामने पाहायचीदेखील वेगळी गंमत असते.