|| गौरव जोशी

मँचेस्टरवरून नॉटिंगहॅमला जाताना बक्सटन नावाचे एक छोटसे गाव लागते. ते इंग्लडमधील सर्वात उंचावर म्हणजेच साधारण ३२०० फुटांवर वसलेले गाव आहे. डाव्या बाजूला मँचेस्टर दिसते तर उजव्या बाजूला नॉटिंगहॅम. बक्सटन गावाचे सौंदर्य म्हणजे येथे मोठय़ा प्रमाणात चुनखडी आहे. संपूर्ण इंग्लडमध्ये मिनरल वॉटरच्या बाटल्या वर्षभर येथूनच पाठवल्या जातात. परंतु क्रिकेट आणि बक्सटनची एक वेगळीच कहाणी आहे. बक्सटन हे गाव अगदी डर्बिशायरच्या सीमेवर आहे. गेली कित्येक वर्षे डर्बिशायर आणि लँकेशायर सामना बक्सटनला होत आहे.

बक्सटन क्रिकेट क्लबवर १९७५मध्ये झालेला क्रिकेट सामना हा अतिहिमवर्षांवामुळे थांबवण्यात आला होता. १ जून १९७५ हा तो दिवस होता. आश्चर्याची बाब अशी की १ जून म्हणजेच इंग्लडमधील उन्हाळ्याचा पहिला दिवस. डर्बिशायर आणि लँकेशायर या दोन संघांमधील तो सामना होता. लँकेशायर संघात अनेक क्लाइव्ह लॉईड, डेव्हिड लॉइड, फारूख इंजिनीयर असे मातब्बर खेळाडू खेळत होते. सकाळच्या वेळी खेळण्यासाठी अनुकूल असे छान वातावरण होते. सगळीकडे लख्ख प्रकाश होता. त्या उन्हाचा आनंद घेण्यासाठी काही लोक तर उघडेच त्या मैदानात बसले होते, असे तेथील वयस्क गृहस्थाने सांगितले.

लँकेशायरच्या जबाबदार फलंदाजांनी डावाला आकार दिला. परंतु दुपारच्या नंतर चार-पाच वाजता वातावरण बदलायला लागले. विजांच्या गडगडासहीत पावसाला सुरुवात झाली. रात्रीच्या वेळी खेळाडू हॉटेलमध्ये गेल्यावर रात्रभर हिमवृष्टी झाली. दोन्ही संघांना याची कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दोन्ही संघ मैदानात उतरले, तेव्हा संपूर्ण मैदान हिमाच्छादनामुळे पांढरेशुभ्र झाले होते. त्यावेळी प्रसिद्ध पंच डिकी बर्ड मैदानाच्या मध्यभागी उभे होते. त्यांनी हा सामना रद्द झाल्याचे खेळाडूंना सांगितले, तेव्हा सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला.

कारण आदल्या दिवशी कडक ऊन आणि लगेच दुसऱ्या दिवशी इतकी हिमवृष्टी. क्लाइव्ह लॉइडसारखा महान खेळाडू जरी पाच-सहा वर्षे क्लब क्रिकेट खेळला असला तरी त्याने त्याच्या आयुष्यात इतका बर्फ मैदानात पाहिला नव्हता. क्लाइव्हने खेळपट्टीजवळ जाऊन तिथला बर्फ उचलला आणि फारूख इंजिनीअरच्या अंगावर उडवला. फारूखनेदेखील संधी साधत क्लाइव्हच्या अंगावर बर्फफेक केली आणि हिमवृष्टीचा आनंद घेतला. बर्फ वितळेपर्यंत काहीच होणे शक्य नसल्याने बर्ड यांनी खेळाडूना सांगिलते. एक तर बर्फात खेळा नाही किंवा हॉटेलमध्ये परत जा, अशी सूचना खेळाडूंना देण्यात आली होती. एप्रिलमध्ये हिमवृष्टी होते, परंतु जून महिन्यात हिमवृष्टी झाल्याने बर्फाने सामना थांबवल्याची ही पहिलीच घटना. परंतु असा प्रसंग परत कधीच आला नाही.

हिमवृष्टी थांबल्यानंतर मैदानावरील बर्फ वितळून गेला आणि सूर्याने दर्शन दिले. तिसऱ्या दिवशी सामना परत सुरू झाला. त्या काळी खेळपट्टीवर आच्छादनेसुद्धा नव्हती. डर्बिशायरचा संघ दोन्ही डावांत १००पेक्षा कमी धावांत बाद झाल्यामुळे लँकेशायरचा संघ विजयी झाला. परंतु या सामन्याचे कवित्व अद्याप कायम आहे.