२०१९ विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. पहिल्या ३ सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषक इतिहासात दक्षिण आफ्रिकेच्या संघाची पहिल्यांदाच इतकी वाताहत झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी खेळाडू एबी डिव्हीलियर्सने आपली निवृत्ती मागे घेत, पुन्हा एकदा संघासाठी खेळण्याची तयारी दाखवली होती. मात्र आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने त्याची ही विनंती मान्य केलेली नाहीये. अंतिम संघ जाहीर करण्याआधी डिव्हीलियर्सने आफ्रिकन बोर्डाकडे ही विनंती केल्याचं समजतंय.

अवश्य वाचा – World Cup 2019 IND vs SA : हिटमॅनची ‘आफ्रिकन सफाई’ ! सलामीच्या सामन्यात भारत विजयी

ESPNCricinfo या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात डिव्हीलियर्सने आफ्रिकन क्रिकेट बोर्डाकडे निवृत्ती मागे घेण्याची ऑफर दिली होती. यासाठी डिव्हीलियर्सने कर्णधार डु प्लेसिस आणि प्रशिक्षक ओटीस गिब्सन यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र निवड समितीचे सदस्य लिंडा झोंडी यांनी डिव्हीलियर्सला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन विश्वचषक संघात संधी मिळणं शक्य नसल्याचं सांगितलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने डिव्हीलियर्सच्या विनंतीचा विचारही केला नसल्याचं समजतंय.

२०१८ साली मे महिन्यात डिव्हीलियर्सने आपली निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे विश्वचषक संघात निवड होण्यासाठीचा प्राथमिक निकष डिव्हीलियर्स पूर्ण करत नव्हता. याचसोबत मध्यंतरीच्या काळात डिव्हीलियर्सने आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटपासूनही स्वतःला दूर ठेवलं होतं. डिव्हीलियर्सची संघात निवड केल्यास दुसऱ्या खेळाडूंवर अन्याय होईल असं मत निवड समितीमधील काही सदस्यांनी व्यक्त केलं. याच कारणांमुळे डिव्हीलियर्सचं पुनरागमन आफ्रिकन क्रिकेट बोर्डानेच नाकारलं.

अवश्य वाचा – World Cup 2019 : भारतीय संघाच्या विश्वचषक वेळापत्रकावर सुनिल गावसकरांचं प्रश्नचिन्ह