विश्वचषक २०१९ या स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या २ संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघानी अनुक्रमे भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघाना पाणी पाजून अंतिम सामन्यात धडक मारली. या स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाला एकही सामना जिंकता आला नाही. त्यांच्या या निराशाजनक कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाच्या नेतृत्वात बदल करण्यात आला. अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व २० वर्षीय फिरकीपटू रशीद खान यांच्याकडे सोपवण्यात आले. एकदिवसीय, कसोटी आणि टी २० अशा तीनही प्रकारच्या किर्केट प्रकारात तो आता अफगाणिस्तानचे नेतृत्व करणार आहे.

विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याआधी या संघाचे नेतृत्व गुलबदीन नैब यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्या आधी असगर अफगाण हा कर्णधाराच्या भूमिकेत होता. विशेष म्हणजे आता रशीद खान यांच्याकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर असगर अफगाण यांच्याकडे उपकर्णधार पद सोपवण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेआधी असगर अफगाण यांच्याकडे संघाचे नेतृत्व होते. विश्वचषकात असगरने २६ च्या सरासरीने १५४ धावा केल्या. तर नैबने २२ च्या सरासरीने १९४ धावा केल्या. शिवाय त्याने गोलंदाजीतही ९ गडी टिपले. विश्वचषक स्पर्धेआधी नैबकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते, पण त्याला संघाच्या कामगिरीत सुधारणा करता आली नाही. भारतासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी कडवी झुंज दिली, पण तरीदेखील दुर्दैवाने त्यांना एकही विजय मिळवता आला नाही.