20 November 2019

News Flash

Cricket World Cup 2019 : बांगलादेशी वाघांची झुंज असफल, कांगारु ४८ धावांनी विजयी

मुश्फिकुर रहिमचं नाबाद शतक

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाने आश्वासक पद्धतीने गोलंदाजांचा सामना केला, मात्र मोक्याच्या क्षणी गमावलेल्या विकेट आणि योग्य धावगती न राखता आल्यामुळे कांगारुंनी सामन्यात बाजी मारली आहे. तमिम इक्बाल, शाकीब अल हसन, मुस्तफिकुर रहिम, मेहमद्दुला यांची झुंद मोडून काढत ऑस्ट्रेलियाने ४८ धावांनी विजय संपादन केला. बांगलादेशकडून यष्टीरक्षक मुश्फिकुर रहिमने नाबाद शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा सामना करताना मुश्फिकुर रहिमने १०१ धावा केल्या. त्याला तमिम इक्बाल आणि मेहमद्दुला यांनी फटकेबाज अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. मात्र त्यांची ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यास अपुरी पडली.

डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली होती. गोलंदाजीत ३ बळी घेऊन चमकलेला सौम्या सरकार फलंदाजीत आपली छाप पाडू शकला नाही. १० धावांवर असताना फिंचने त्याला धावबाद केलं. यानंतर शाकीब अल हसन आणि तमिम इक्बाल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. शाकीब माघारी परतल्यानंतरही तमिम इक्बालने आपलं अर्धशतक पूर्ण करत लढा सुरु ठेवला, मात्र ६२ धावांवर तो देखील माघारी परतला.

यानंतर मधल्या फळीत मुश्फिकुर रहिम आणि मेहमद्दुला जोडीने चांगली फटकेबाजी केली, मात्र तोपर्यंत ऑस्ट्रेलियाचं पारडं सामन्यात वरचढ झालं होतं. मोक्याच्या क्षणी फलंदाजांना माघारी धाडत कांगारुंनी ऑस्ट्रेलियावरचा दबाव वाढवला. मुश्फिकुरने तळ्यातल्या फलंदाजांना सोबत घेऊन आपलं शतक साजरं केलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि नॅथन कुल्टर-नाईल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, झॅम्पाने एक बळी घेतला

दरम्यान, सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचं शतक आणि कर्णधार अरॉन फिंच, उस्मान ख्वाजाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३८१ धावांपर्यंत मजल मारली. टिंगहॅमच्या मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत वॉर्नर, फिंच आणि ख्वाजा या फलंदाजांनी मैदानात चौकार, षटकारांची आतिषबाजी केली. बांगलादेशचा एकही गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश लावू शकला नाही. कामचलाऊ गोलंदाज सौम्या सरकारने ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशसमोर ३८२ धावांचं आव्हान आहे.

कर्णधार फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. सौम्या सरकारने रुबेल हुसेनकरवी फिंचला झेलबाद करत माघारी धाडलं. यानंतर मैदानात आलेल्या उस्मान ख्वाजाने वॉर्नरच्या साथीने पुन्हा एकदा भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी केली. यादरम्यान वॉर्नरने आपलं शतकही साजरं केलं. सरकारने वॉर्नरला माघारी धाडत कांगारुंना आणखी एक धक्का दिला. वॉर्नरने १४७ चेंडूत १६६ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.

अवश्य वाचा – Aus vs Ban : सोळावं शतक मोक्याचं, धवनला मागे टाकत वॉर्नर ठरला ‘गब्बर’

अखेरच्या षटकांमध्ये ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढवण्याकडे भर दिला. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावबाद झाला. स्टिव्ह स्मिथही मुस्तफिजूर रेहमानच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. अखेरच्या षटकांमध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत, कांगारुंच्या धावगतीला अंकुश लावला. बांगलादेशकडून सौम्या सरकारने ३, मुस्तफिजूर रेहमानने १ बळी घेतला. कांगारुंचा एक फलंदाज धावबाद झाला. ४९ व्या षटकादरम्यान सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना मध्येच थांबवण्यात आला. काहीवेळाने पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. स्टॉयनिस आणि केरी जोडीने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत संघाला ३८१ धावांचा टप्पा गाठून दिला.

First Published on June 20, 2019 7:11 pm

Web Title: icc cricket world cup 2019 aus vs ban nottingham psd 91
Just Now!
X