विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ पहिल्या उपांत्य फेरीत पराभूत झाला. न्यूझीलंडने अटीतटीच्या स्पर्धेत भारताला १८ धावांनी मात दिली. भारताची आघाडीची फळी म्हणजेच सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे तिघेही अत्यंत सुमार कामगिरी करून बाद झाले. न्यूझीलंडने दिलेल्या माफक २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी केवळ ५ धावांत माघारी परतली. तशीच काहीशी अवस्था दुसऱ्या उपांत्य सामन्यातही दिसून आली.

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा डेव्हिड वॉर्नर, कर्णधार आरोन फिंच आणि पीटर हँड्सकॉम्ब या तीन फलंदाजांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाची पार निराशा केली. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून फिंचने फलंदाजी स्वीकारली. आव्हानाचा पाठलाग करण्याचे दडपण कमी करण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. त्यानंतर वॉर्नरने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. पण त्यानंतर मात्र इंग्लंडने दमदार पुनरागमन केले.

इंग्लंडचा हुकुमी एक्का जोफ्रा आर्चर याने आपल्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार फिंचला बाद केले. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार फिंच शून्यावर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. पंचांच्या निर्णयावर फिंचने रिव्ह्यू घेतला मात्र तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद ठरवले. त्यानंतर वॉर्नरने एक चौकार खेचत ऑस्ट्रेलियावरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. पण उसळत्या चेंडूवर बॅटची कड लागून वॉर्नरदेखील बाद झाला. ज्या प्रमाणे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे जण भारतीय फलंदाजीचा कणा असूनही झटपट बाद झाले, अगदी तसेच वॉर्नर आणि फिंच माघारी परतले. त्यानंतर पुढील गडी डाव सांभाळतील, अशी अपेक्षा लोकेश राहुल प्रमाणेच पीटर हँड्सकॉम्बदेखील लवकर बाद झाला. त्यामुळे भारताच्या डावाचेच पुनःप्रक्षेपण चालू आहे की काय अशी चर्चा काही काळ रंगलेली पाहायला मिळाली.