पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ४१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करताना पाकिस्तान समोर ३०७ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला केवळ २६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी त्यांनी ४१ धावांनी सामना गमावला.

याआधी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचं शतक आणि त्याला कर्णधार अरॉन फिंचने ८२ धावांची खेळी करुन दिलेल्या साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३०७ धावांपर्यंत मजल मारली.  आश्वासक सुरुवातीनंतर एका क्षणाला ऑस्ट्रेलियाचा संघ ३५० धावांचा पल्ला गाठेल असं वाटतं होतं, मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे कांगारुंचा संघ मोठी मजल मारु शकला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने कांगारुंचा निम्मा संघ बाद केला.

दरम्यान नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानच्या आक्रमणातही हवाच काढून घेतली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिरने ऑस्ट्रेलियन कर्णधार अरॉन फिंचला माघारी धाडत कांगारुंना पहिला धक्का दिला. यानंतर डेव्हिड वॉर्नरने स्मिथच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र स्टिव्ह स्मिथ आणि पाठीमागून आलेला ग्लेन मॅक्सवेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतले. दरम्यानच्या काळात वॉर्नरने आपलं शतक साजरं केलं. मात्र १०७ धावांवर तो ही माघारी परतला. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिर, शाहिन आफ्रिदी यांनी भेदक मारा करत कांगारुंची अखेरची फळी कापून काढली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरच्या ५ बळींव्यतिरीक्त शाहिन आफ्रिदीने २ तर हसन अली-वहाब रियाझ-मोहम्मद हाफिज यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.