मिचेल स्टार्क आणि जेसन बेहरनडॉर्फने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोरचं आव्हान आणखी कठीण करुन ठेवलं आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८६ धावांनी मात करत आपलं गुणतालिकेतलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या २४४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ केवळ १५७ धावांपर्यंतच मजल मारु शकला. स्टार्कने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय पुरता फसला. लॉकी फर्ग्युसन, जिमी निशम आणि ट्रेंट बोल्ट यांनी भेदक मारा करत अवघ्या ९२ धावांत कांगारुंचा निम्मा संघ माघारी धाडला. मात्र या परिस्थितीचा फायदा उठवणं न्यूझीलंडला जमलं नाही. उस्मान ख्वाजाने अॅलेक्स कॅरीच्या मदतीने भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत कांगारुंना २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. ख्वाजाने ८८ तर कॅरीने ७१ धावा केल्या. ट्रेंट बोल्टने या सामन्यात अखेरच्या षटकात हॅटट्रीकची नोंद केली. या स्पर्धेत हॅटट्रीक नोंदवणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने ४, जिमी निशम आणि लॉकी फर्ग्यसुनने प्रत्येकी २-२ तर कर्णधार केन विल्यमसनने १ बळी घेतला.

२४४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवातही खराब झाली. हेन्री निकोलास आणि मार्टीन गप्टील हे सलामीवीर बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये ५५ धावांची अर्धशतकी भागीदारीही झाली. मात्र स्टार्कने कर्णधार विल्यमसनला माघारी धाडत न्यूझीलंडची जोडी फोडली. विल्यमसनने ४० धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडच्या डावाला गळतीच लागली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. मिचेल स्टार्कने भेदक मारा करत न्यूझीलंडची अखेरची फळी कापून काढली. या पराभवामुळे न्यूझीलंडचं उपांत्य फेरीतलं स्थानही आता डळमळीत झालेलं आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध विजयाची गरज आहे.