WC 2019 BAN vs AFG : अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात बांगलादेशने ६२ धावांनी दमदार विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानला २६३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शाकिब अल हसनने टिपलेल्या ५ बळींच्या जोरावर बांगलादेशने अफगाणिस्तानला २०० धावांवरच तंबूत धाडले. या विजयामुळे बांगलादेशने गुणतालिकेत ७ सामन्यात ७ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. अर्धशतकी खेळी आणि ५ गडी टिपणाऱ्या शाकिब अल हसनला सामनावीर घोषित करण्यात आले.

या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांकडून सुरुवातीला काहीशी झुंज पाहायला मिळाली. पण शाकिबच्या माऱ्यापुढे ते झटपट ढेपाळले. शाकिब अल हसनच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. शाकिबने गुलबदिन नैब, रहमत शाह, अफगाण, मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह अशा ५ फलंदाजांना माघारी धाडले. अफगाणिस्तान कडून समीउल्लाह शेनवारीने सर्वाधिक नाबाद ४९ धावा केल्या. त्या खालोखाल सलामीवीर नैबने ४७ धावांची खेळी केली. पण इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. बांगलादेशच्या डावाची सुरुवात फारशी सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १७ धावांवर लिटन दास माघारी परतला. त्याने केवळ २ चौकार लगावले. तमिम इकबालने शाकिब अल हसनच्या साथीने चांगली खेळी केली. त्या दोघांमध्ये ५९ धावांची भागीदारी झाली. पण बॅकफूटवर येऊन फटका मारताना तो नबीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने ३६ धावा केल्या. शाकिब अल हसनने मात्र आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावले. पण दुर्दैवाने ५१ धावांवर खेळताना तो पायचीत झाला. शाकिबने केवळ १ चौकार लगावला. मुशफिकूर रहीम आणि शाकिब यांच्यात ६१ धावांची भागीदारी झाली.

शाकिब माघारी गेल्यानंतर मुशफिकूर रहिमने डावाची सूत्रे हात घेतली. पण दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळू शकली नाही. सौम्या सरकार केवळ ३ धावांवर बाद झाला. महमदुल्लाहदेखील चांगली सुरुवात मिळाल्यानंतर २७ धावा करून माघारी गेला. शेवटच्या टप्प्यात मुशफिकूर रहिमने फटकेबाजी केली. त्याने ४ चौकार आणि १ षटकार खेचत ८७ चेंडूत ८३ धावा केल्या. मोसादेक २४ चेंडूत ३५ धावांची आक्रमक खेळी केली आणि बांगलादेशला ५० षटकात ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारून दिली. मुजीबने ३, नैबने २ तर झादरान आणि नबी यांनी १-१ बळी टिपला.