भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. भारताने ४ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले, तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसाने वाया घालवला. त्यामुळे भारताचे ७ गुण आहेत. भारताने दमदार प्रदर्शन करत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यासारख्या संघांना धूळ चारली. पाकिस्तानविरुद्धचा भारताचा विजय नेहमीप्रमाणेच खास ठरला. या सामन्यानंतर भारतीय संघाला तब्बल ५ ते ६ दिवसांचा ‘ब्रेक’ मिळाला. या काळात टीम इंडियाच्या काही शिलेदारांनी नवीन हेअरस्टाईल करून घेतली.

भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी, अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि फिरकीपटू युझवेंद्र चहल यांनी विश्रांतीच्या वेळेचा सदुपयोग करत झकासपैकी नवीन हेअरस्टाईल केली. BCCI ने स्वतः या चौघांचा फोटो ट्विट करत या बद्दलची माहिती दिली आहे.

दरम्यान, पाकविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ३३६ धावांचा डोंगर उभारला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पुरता फसला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची शतकी भागीदारी केली. राहुलने अर्धशतक केले. तर रोहितने १४० धावांची धमाकेदार खेळी केली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीनेही ७७ धावांची खेळी केली. याच बळावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ तर हसन अली आणि वहाब रियाझ यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला.

या लक्ष्याचा पाठलाग करताना ३५ षटकात पाकिस्तानने १६६ धावांत ६ या धावसंख्येपर्यंत मजल मारली. यातही सलामीवीर फखार झमान आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. फखार झमानने आपले अर्धशतक झळकावले. पण इतर खेळाडूंना आपली चमक दाखवता आली नाही. पाकिस्तानच्या डावाला गळती लागली. दरम्यान पावसामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न नियम लागू झाला आणि पाकला ५ षटकात १३६ धावांचे महाकाय आव्हान मिळाले. हे आव्हान पाकिस्तानला पेलता आले नाही. भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.