News Flash

cricket world cup history : इतिहास

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना डकवर्थ-लुईसच्या नियमामुळे गाजला.

१९८७ : विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडवगळता भारत-पाकिस्तान यांनी संयुक्तपणे स्पर्धेचे आयोजन केले. यावेळी इंग्लंडने १९७९च्या कामगिरीची पुनरावृत्ती करत अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांनी भारताला पराभूत करून १९८३च्या पराभवाचा वचपा काढला. मात्र अंतिम फेरीत बलाढय़ ऑस्ट्रेलियाने डेव्हिड बूनच्या अफलातून फटकेबाजीमुळे २५४ धावांचे कठीण लक्ष्य इंग्लंडपुढे ठेवले. प्रत्युत्तरात बिली अ‍ॅथे (५८) व कर्णधार माईक गॅटिंग (४१) यांच्या संघर्षांनंतरही अवघ्या ७ धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंडच्या ग्रॅहम गूचने या विश्वचषकात सलग तीन सामन्यांत सामनावीर पुरस्कार मिळवून विक्रम प्रस्थापित केला.

१९९२ :  १९९२च्या विश्वचषकात ग्रॅहम गूचच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा जगज्जेतेपदाने हुलकावणी दिली. साखळी सामन्यात झिम्बाब्वेकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारणाऱ्या इंग्लंडने आठपैकी पाच सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना डकवर्थ-लुईसच्या नियमामुळे गाजला. १० मिनिटांसाठी झालेल्या वरुणराजाच्या वर्षांवामुळे आफ्रिकेपुढील १३ चेंडूंत २२ धावांचे लक्ष्य रद्द होऊन अवघ्या एका चेंडूंत २१ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य त्यांना देण्यात आले. साहजिकच आफ्रिकेचा पराभव झाला. मात्र अंतिम फेरीत पाकिस्तानने २२ धावांनी सरशी साधून इंग्लंडला उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले.

१९७५ : ‘क्रिकेटचा जन्मदाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडकडून पहिल्याच विश्वचषकात विजेतेपदाची अपेक्षा बाळगली जात होती. त्यातच यजमानपद मिळालेल्या इंग्लंडने धडाक्यात सुरुवात करत पहिल्याच सामन्यात भारताला तब्बल २०२ धावांनी धूळ चारली. कर्णधार माइक डेनिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठली होती. मात्र गॅरी गिल्मोरच्या (१४ धावांत सहा बळी) भेदक माऱ्यापुढे त्यांची फलंदाजी पुरती ढेपाळली आणि इंग्लंडचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडने दिलेले ९४ धावांचे लक्ष्य सहा फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले.

१९७९ : सलग दुसऱ्या वर्षी इंग्लंडला यजमानपद बहाल करण्यात आले. साखळीतील सर्व सामने जिंकून इंग्लंडने उपांत्य फेरीत न्यूझीलंडलाही धूळ चारली. जेफ्री बॉयकॉट, ग्रॅहम गूच यांसारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश असल्यामुळे इंग्लंडला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु बलाढय़ वेस्ट इंडिजने त्यांना ९२ धावांनी नमवले. २८७ धावांच्या प्रत्युत्तरात कर्णधार माईक ब्रेअरली (६४) व बॉयकॉट (५७) यांच्या १२९ धावांच्या सलामीनंतरही इंग्लंडचा डाव १९४ धावांत गडगडला.

१९८३ : तिसऱ्यांदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणाऱ्या इंग्लंडने यावेळीही दिमाखात कामगिरी करत साखळीतील सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले. परंतु धक्कादायक कामगिरी करणाऱ्या भारताने उपांत्य सामन्यात इंग्लंडला सहा गडी राखून नामोहरम केले. ग्रॅमी फ्लावरच्या ३० धावांच्या बळावर इंग्लंडने २१३ धावा केल्या होत्या.

१९९६ : सलग सहा विश्वचषकात किमान उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा इंग्लंड पहिला संघ ठरला. ‘ब’ गटात सहभागी होणाऱ्या इंग्लंडला साखळीत पाचपैकी दोन सामनेच जिंकता आले. उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या (४४ चेंडूंत ८२ धावा) झंझावाती खेळीपुढे इंग्लंडचा पालापाचोळा झाला. इंग्लंडने दिलेले २३६ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने अवघ्या ४० षटकांत गाठून त्यांच्या वाटचालीवर पूर्णविराम लगावला.

१९९९ : पुन्हा एकदा इंग्लंडला विश्वचषकाचे यजमानपद मिळाले. मात्र इंग्लंडने त्या विश्वचषकात सर्वाधिक सुमार कामगिरीचे प्रदर्शन केले. भारत, दक्षिण आफ्रिका संघांनी इंग्लंडला सहज परभूत केले. पाच पैकी तीन सामने जिंकूनही निव्वळ धावगती कमी असल्यामुळे इंग्लंडला प्रथमच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले. झिम्बाब्वेने धक्कादायक कामगिरी करत इंग्लंडवर सरशी साधून गटात तिसरा क्रमांक मिळवला.

२००३ : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या विश्वचषकातील झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून इंग्लंडने सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतल्यामुळे झिम्बाब्वेला विजयी घोषित करण्यात आले. भारत, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करूनही इंग्लंडने उर्वरित तीन सामन्यांत विजय मिळवला. मात्र पुन्हा एकदा त्यांना साखळी फेरीचा अडथळा ओलांडणे जमले नाही.

२००७ : दोन विश्वचषकात बाद फेरीपासून वंचित राहिल्यावर २००७मध्ये इंग्लंडने ‘सुपर-८’ फेरीत स्थान मिळवले. मायकल वॉनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ‘क’ गटात केनिया, कॅनडाला धूळ चारली. मात्र अव्वल-आठ फेरीत सात पैकी फक्त तीन लढतींत त्यांना विजयाची चव चाखता आली. त्यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंड या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांखाली म्हणजेच पाचव्या क्रमांकावर समाधान बाळगावे लागले.

२०११ : कर्णधार अँड्रय़ू स्ट्रॉसच्या झुंजार शतकामुळे इंग्लंडने ‘ब’ गटातील साखळी सामन्यात भारताला बरोबरीत रोखले, परंतु आर्यलड आणि बांगलादेशसारख्या तुलनेने कमकुवत संघांनी इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ माजवली. आर्यलडच्या केव्हिन ओब्रायनने इंग्लंडविरुद्ध अवघ्या ५० चेंडूंत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. उपांत्यपूर्व फेरीत तिलकरत्ने दिलशान व उपुल थरंगा यांच्या २३१ धावांच्या विक्रमी सलामी भागीदारीमुळे इंग्लंडला उपांत्यपूर्व फेरीत स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

२०१५ : ऑस्ट्रेलियात झालेला २०१५चा विश्वचषक इंग्लंडसाठी भयानक स्वप्नासारखा ठरला. बांगलादेशने त्यांना सलग दुसऱ्या विश्वचषकात खडे चारले, तर न्यूझीलंडच्या टिम साऊदीपुढे (७/२३) त्यांची फलंदाजी पत्त्याच्या बंगलाप्रमाणे कोसळली. त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 3:20 am

Web Title: icc cricket world cup 2019 cricket world cup history
Next Stories
1 विश्वचषकासाठी तंदुरुस्त राहण्यावर गेलचा भर
2 रोहित माझी बायको नाहीये, शिखर धवन असं का म्हणाला? जाणून घ्या…
3 World Cup 2019 : विश्वचषकासाठीच्या टीम इंडियामध्ये कमतरता – गंभीर
Just Now!
X