यजमान इंग्लंडने दुबळ्या अफगाणिस्तानावर विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी धडक मारली. इंग्लंडने १५० धावांनी सामना एकतर्फी जिंकला. कर्णधार मॉर्गनच्या झंझावाती १४८ धावांच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानपुढे ३९८ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते. पण अफगाणिस्तानला केवळ ८ बाद २४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. अफगाणिस्तानला ५ सामन्यात अद्यापही गुणांचे खाते उघडता आलेले नाही.

या सामन्यात इंग्लंडच्या संघाने दमदार फलंदाजी करत ३९७ धावा कुटल्या. यात सर्वाधिक योगदान कर्णधार इऑन मॉर्गन याचे ठरले. त्याने १७ षटकार खेचत ७१ चेंडूत १४८ धावांची तुफानी खेळी केली. त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला आहे. या खेळीबाबत बोलताना मॉर्गन म्हणाला की अशा प्रकारची खेळी माझ्याकडून खेळली जाईल असे मला अजिबातच वाटले नव्हते.

हे वाचा – Video : कॅप्टन मॉर्गनचा धमाका! पहा ‘ते’ १७ षटकार

ज्या पद्धतीची खेळी मी खेळलो त्यामुळे मी प्रचंड खुश आहे. हे काहीतरी वेगळंच होतं. एकाच डावात इतके षटकार खेचणे ही बाब खूप आनंददायी आहे. केवळ षटकारच नव्हे, तर झटपट शतकी खेळी करणे आणि ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी करणे हे सर्च माझ्यासाठी स्वप्नवत आहे. असे काही माझ्याकडून होईल असे मला वाटले नव्हते. पण मला त्या खेळीचा आनंद आहे, असे मॉर्गन म्हणाला.

गेल्या ४ वर्षात मी चांगला खेळ केला. पण ५० किंवा ६० चेंडूत शतक ठोकणे मला शक्य झाले नव्हते. ही खेळी कदाचित कुठीतरी दडलेली होती. ती अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानावर साकारली गेली असेही मॉर्गनने सांगितले.

हे वाचा – World Cup 2019 : मॉर्गन नवा ‘सिक्सर किंग’; १७ षटकारांसह मोडला रोहितचा विक्रम

दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ४४ धावांच्या सलामी भागीदारी नंतर विन्स २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटच्या साथीने बेअरस्टोने डाव सांभाळला. या दोघांनी १२० धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणारा बेअरस्टो शतकाला मात्र मुकला. ९० धावांवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. जो रुटने आपली खेळी चालू ठेवली आणि कर्णधार मॉर्गनच्या साथीने खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले.

रूटचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर मॉर्गनने खेळाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. त्याने तुफानी फटकेबाजी करत केवळ ५७ चेंडूत १०० धावांचा पल्ला गाठला. इतकेच नव्हे तर त्याने तब्बल १७ षटकार आणि ४ चौकार यांच्या मदतीने ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी केली. मोठा फटका खेळताना रूट आणि मॉर्गन दोघेही एकाच षटकात माघारी परतले. त्यानंतर मोईन अलीने ४ षटकार आणि १ चौकार खेचत ९ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या आणि संघाला ५० षटकात ६ बाद ३९७ धावांची मजल मारून दिली.

या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ ८ बाद २४७ धावांपर्यंतच मजल मारता आली.