ऑस्ट्रेलियाने विश्वचषक २०१९ मध्ये यजमान इंग्लंडवर ६४ धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरी गाठली. कर्णधार फिंचच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २८५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने एकाकी ८९ धावांची झुंज दिली, पण जेसन बेहेरनडॉर्फने टिपलेल्या ५ बळींमुळे इंग्लंडला केवळ २२१ धावांपर्यंतच मजल मारता आली. १२ गुणांसह उपांत्य फेरीचे तिकीट मिळवणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे, तर पराभवामुळे इंग्लंडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

या सामन्यात catches win matches हे समीकरण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी तंतोतंत खरं करून दाखवलं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सामन्यात १० पैकी ७ बळी हे झेलबाद पद्धतीने माघारी धाडले. प्रत्येक खेळाडूने घेतलेला झेल हा ऑस्ट्रेलियाला विजयाच्या अधिकाधिक जवळ घेऊन गेला. या सामन्यात पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा आणि मॅक्सेवल-फिंच असे तीन झेल भन्नाट पद्धतीने टिपले गेले.

ऑस्ट्रेलियाच्या २८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिन्स (०), रूट (८) आणि मॉर्गन (४) हे तिघे झटपट बाद झाले. कर्णधार मॉर्गनने स्टार्कच्या उसळत्या चेंडूवर पूल शॉट खेळला. पण फाईन लेगला पॅट कमिन्सने दमदार झेल टिपला.

पहा व्हिडीओ –

मॉर्गन बाद झाल्यावर जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या दोघांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण बेअरस्टो देखील २७ धावा काढून माघारी परतला. स्टोक्सने जोस बटलरच्या साथीने चांगली खेळी केली. बटलर मोठा फटका मारताना २५ धावांवर बाद झाला. उस्मान ख्वाजाने सीमारेषेच्या अगदी जवळ धावत येऊन हा झेल टिपला.

पहा व्हिडीओ –

पण स्टोक्सने फटकेबाजी सुरूच ठेवली. या दरम्यान त्याने दमदार अर्धशतक ठोकले. ८९ धावांवर खेळत असताना मिचेल स्टार्कच्या यॉर्कर चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ८ चौकार आणि २ षटकार खेचले. त्यानंतर आलेल्या ख्रिस वोक्स (२६) आणि आदिल रशीद (२५) यांनी काही काळ खेळपट्टी सांभाळून पराजय पुढे ढकलला, पण अखेर बेहरनडॉर्फच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा डाव २२१ धावांवरआटोपला. वोक्सने टोलवलेला चेंडू हवेत उंच गेला. तो चेंडू सीमारेषा पार करणार असे वाटत असतानाच मॅक्सवेलने चेंडू झेलला, पण त्याचा तोल जात असल्याने त्याने तो चेंडू आतल्या बाजूला फेकला आणि फिंचने तो चेंडू झेलून कॅच पूर्ण केला.

पहा व्हिडीओ –

सामन्यात बेहेरनडॉर्फने ५, स्टार्कने ४ तर स्टोयनीसने १ बळी टिपला. त्याआधी आरोन फिंचने केलेल्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २८५ धावांपर्यंत मजल मारली होती. याच सामन्यात डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक पूर्ण करत स्पर्धेत ५०० धावांचा टप्पाही पार केला.