जवळपास गेली दोन वर्षे जागतिक एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असणाऱ्या इंग्लंडला यंदा विश्वचषक उंचावण्याची सर्वाधिक संधी आहे. तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानाव्या लागणाऱ्या इंग्लंडला जेफ्री बॉयकॉट, ग्रॅहम गूच यांसारख्या मातब्बर खेळाडूंचा वारसा लाभला आहे. त्याचबरोबर मायकल वॉन, पॉल कॉलिंगवूड, केव्हिन पीटरसन असे एका पेक्षा एक सरस खेळाडू इंग्लंडने क्रिकेटविश्वाला दिले. मात्र यांपैकी कोणालाही जगज्जेतेपदाचे सुख लाभले नाही. २१व्या शतकात इंग्लंडची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी अधिक ढासळली. २०११ व २०१५च्या विश्वचषकामध्ये आर्यलड, बांगलादेश यांसारख्या तुलनेने कमकुवत संघांविरुद्ध पराभूत झाल्यामुळे इंग्लंडच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ‘क्रिकेटचा जन्मदाता’ असूनही विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरलेल्या इंग्लंडला नेहमीच चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. परंतु यावेळी विश्वचषकाचे यजमानपद भुषवत असल्यामुळे इंग्लंडला खेळपट्टय़ांची पूर्ण कल्पना असून चाहत्यांचाही त्यांना मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा लाभेल.  सर्व खेळाडूंची सांघिक कामगिरी जुळून आल्यास इंग्लंडला यावेळी विश्वचषक जिंकण्यापासून रोखणे इतर संघांसाठी आव्हानात्मक ठरेल. त्यामुळे अनुभवी इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंडचा संघ यंदा जगज्जेतेपदाची प्रतीक्षा संपवून  पहिल्यावहिल्या विश्वचषकाला गवसणी घालणार का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

अपेक्षित कामगिरी

२०१५च्या विश्वचषकानंतर इंग्लंडच्या संघाने इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली उंच भरारी घेतली आहे. त्यातच हा विश्वचषक इंग्लंडमध्येच होत असल्याने यजमानांना विजेतेपदासाठी सर्वच क्रिकेट पंडितांकडून प्रथम पसंती मिळत आहे. धडाकेबाज फलंदाज, अनुभवी कर्णधार आणि उपयुक्त अष्टपैलू खेळाडू यांच्यामुळे इंग्लंडला अंतिम फेरीपर्यंत मजल मारण्यापासून रोखणे इतर संघांसाठी आव्हानात्मक असेल. तरीही भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या तुल्यबळ संघांपासून इंग्लंडला सावध राहण्याची आवश्यकता आहे.

बलस्थाने आणि कच्चे दुवे

जो रूट, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो यांसारखे सुरेख फलंदाज, बेन स्टोक्स, मोईन अली असे गुणी अष्टपैलू यांच्यामुळे इंग्लंडची फलंदाजीची फळी इतर संघांपेक्षा घातक वाटते आहे. नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’मध्ये बेअरस्टोने धावांचा रतीब रचला होता, तर बटलरने काही दिवसांपूर्वीच ५० चेंडूंत शतक झळकावत सर्व संघांना इशारा दिला आहे. अनुभवी गोलंदाजांची कमतरता इंग्लंडला दडपणाच्या परिस्थितीत महागात पडू शकते. मार्क वूड, टॉम करन पहिलाच विश्वचषक खेळत असल्यामुळे लिआम प्लंकेटवर अतिरिक्त भार पडू शकतो. मातब्बर खेळाडूंचा समावेश असूनही इंग्लंडला मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावण्यात नेहमीच अपयश आले आहे. चॅम्पियन्स करंडक २०१७मध्ये त्यांना पाकिस्तानने उपांत्य फेरीत नमवले होते. मात्र विश्वचषकात त्यांना कामगिरी सुधारावी लागेल.

संकलन : ऋषिकेश बामणे