विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

Live Blog

00:32 (IST)15 Jul 2019
इंग्लंडचा ‘सुपर’ विजय! क्रिकेटला मिळाला नवा विश्वविजेता

सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

00:00 (IST)15 Jul 2019
सुपर ओव्हर : न्यूझीलंड १५ धावा, इंग्लंड नवा विश्वविजेता

गोलंदाज - जोफ्रा आर्चर



बॉल ० - व्हाईड 

बॉल १ - २ धावा (नीशम)

बॉल २ - षटकार (नीशम)

बॉल ३ - २ धावा (नीशम)

बॉल ४ - २ धावा (नीशम)

बॉल ५ - १ धाव (नीशम)

बॉल ६ - १ धाव आणि धावचीत (गप्टील)

23:45 (IST)14 Jul 2019
सुपर ओव्हर : इंग्लंड - १५ धावा, न्यूझीलंडला विजयासाठी १६ धावांची गरज

गोलंदाज - ट्रेंट बोल्ट



बॉल १ - ३ धावा (स्टोक्स)

बॉल २ - १ धाव (बटलर)

बॉल ३ - चौकार (स्टोक्स)

बॉल ४ -  १ धाव (स्टोक्स)

बॉल ५ - २ धावा (बटलर)

बॉल ६ - चौकार (बटलर)

23:31 (IST)14 Jul 2019
सामना सुपर ओव्हरमध्ये

विश्वचषक स्पर्धा २०१९ चा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये गेलेला आहे. न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील शेवटच्या चेंडूवर १ धाव काढत २४१ धावा करण्यात यश मिळवले. त्यामुळे आता सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये होणार आहे.

23:05 (IST)14 Jul 2019
इंग्लंडला सहावा धक्का, ख्रिस वोक्स माघारी

फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात वोक्स झेलबाद, यष्टीरक्षक टॉम लॅथमने घेतला झेल

22:57 (IST)14 Jul 2019
जोस बटलर झेलबाद; सामना रंगतदार स्थितीत

अर्धशतक पूर्ण केल्यावर मोठा फटका खेळताना जोस बटलर झेलबाद झाला. इंग्लंडची जमलेली जोडी फुटली आणि न्यूझीलंडला मोठा दिलासा मिळाला. बटलरने ६० चेंडूत ५९ धावा केल्या.

22:53 (IST)14 Jul 2019
स्टोक्स - बटलरची अर्धशतके; सामना रंगतदार स्थितीत

अतिशय दडपणाच्या परिस्थितीत उत्तम खेळ करत बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी आपली अर्धशतके साजरी केली. त्यामुळे आता सामना रंगतदार स्थितीत आहे.

22:35 (IST)14 Jul 2019
स्टोक्स-बटलर जोडीने डाव सावरला

स्टोक्स-बटलर जोडीने डाव सावरला

21:22 (IST)14 Jul 2019
कॅप्टन मॉर्गन माघारी; इंग्लंडला चौथा धक्का

सावध खेळ करताना कर्णधार मॉर्गनला मोठा फटका मारण्याचा मोह आवरला नाही. उसळत्या चेंडूवर त्याने फटका खेळला आणि लॉकी फर्ग्युसनने त्याचा अप्रती झेल टिपला. मॉर्गनने २२ चेंडूत ९ धावा केल्या.

21:05 (IST)14 Jul 2019
धोकादायक बेअरस्टो त्रिफळाचीत; इंग्लंडला तिसरा धक्का

एकदा जीवनदान मिळालेला धोकादायक सलामीवीर जॉनी बेअरस्टो स्वतःच्याच चुकीने बाद झाला. बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडू मारण्याच्या नादात बॅटची कड लागून तो त्रिफळाचीत झाला. त्याने ५५ चेंडूत ७ चौकारांसह ३६ धावा केल्या.

20:48 (IST)14 Jul 2019
जो रूट माघारी; इंग्लंडला दुसरा धक्का

स्विंग होणाऱ्या चेंडूंना बाचकत खेळणारा अनुभवी जो रूट कॉलिन डी ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बाहेरच्या दिशेने स्विंग होणाऱ्या चेंडूला बॅटची कड लागून तो झेलबाद झाला. त्याने ३० चेंडूत केवळ ७ धावा करून तंबूत परतला.

20:38 (IST)14 Jul 2019
१४ षटकात इंग्लंडची अर्धशतकी मजल

न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीचा अत्यंत सावधपणे सामना करत जॉनी बेअरस्टो - जो रूट जोडीने १४ व्या षटकात इंग्लंडला अर्धशतकी मजल मारून दिली.

20:07 (IST)14 Jul 2019
जेसन रॉय बाद; इंग्लंडला पहिला धक्का

उपांत्य फेरीत दमदार खेळी करणारा जेसन रॉय अंतिम सामन्यात २० चेंडूत १७ धावा करून माघारी परतला. त्याने ३ चौकार लगावले, पण मॅट हेन्रीने त्याला झेलबाद केले.

19:30 (IST)14 Jul 2019
वोक्स, प्लंकेटचा भेदक मारा; इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद २४१ धावा केल्या. सलामीवीर निकोल्सचे केलेले अर्धशतक (५५) आणि टॉम लॅथमच्या झुंजार ४७ धावा यांच्या बळावर न्यूझीलंडने इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान दिले. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट यांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले.

19:04 (IST)14 Jul 2019
लॅथम ४७ धावांवर बाद; न्यूझीलंडला सातवा धक्का

टॉम लॅथमने झुंजार खेळी करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचत ४७ धावा केल्या.

18:57 (IST)14 Jul 2019
डी ग्रँडहोम बाद; न्यूझीलंडचे ६ गडी माघारी

मोठा फटका खेळताना झाला झेलबाद

18:17 (IST)14 Jul 2019
जिमी निशम झेलबाद; न्यूझीलंडला पाचवा धक्का

चांगला खेळ करण्याची अपेक्षा असलेला अष्टपैलू जिमी निशम मोठा फटका मारताना झेलबाद झाला. २५ चेंडूत ३ चौकारांसह त्याने १९ धावा केल्या.

17:49 (IST)14 Jul 2019
अनुभवी रॉस टेलर बाद; न्यूझीलंडला चौथा धक्का

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर हा खराब पंचगिरीचा शिकार ठरला. त्याला पंचांनी पायचीत बाद ठरवले. बॉल ट्रॅकिंग प्रणालीमध्ये चेंडू स्टंपच्या वरून जात असल्याचे दिसून आले, पण सलामीवीर गप्टीलने रिव्ह्यू वाया घालवल्यामुळे न्यूझीलंडकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हता. त्यामुळे त्यांना DRS ची मदत घेता आली नाही. टेलरने ३१ चेंडूत १५ धावा केल्या.

17:20 (IST)14 Jul 2019
अर्धशतकवीर निकोल्स त्रिफळाचीत; न्यूझीलंडला तिसरा धक्का

एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले, पण त्यानंतर ५५ धावांवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने या खेळीत केवळ ४ चौकार लगावले.

16:58 (IST)14 Jul 2019
कर्णधार विल्यमसन माघारी; न्यूझीलंडला दुसरा धक्का

अत्यंत शांत खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन झेलबाद होऊन माघारी परतला. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते, पण DRS प्रणालीमध्ये तो बाद असल्याचे दिसून आले. त्यामुळे न्यूझीलंडला दुसरा धक्का बसला. विल्यमसनने ५३ चेंडूत २ चौकार लगावत ३० धावा केल्या.

16:20 (IST)14 Jul 2019
१४ व्या षटकात न्यूझीलंडची अर्धशतकी मजल

इंग्लंडच्या भेदक वेगवान माऱ्यामुळे न्यूझीलंडने सावध पवित्रा स्वीकारत १४ व्या षटकात अर्धशतकी मजल मारली.

15:46 (IST)14 Jul 2019
सलामीवीर गप्टील माघारी; न्यूझीलंडला पहिला धक्का

स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी न करणारा सलामीवीर मार्टिन गप्टील स्वस्तात माघारी परतला. त्याने १८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार खेचत १९ धावा केल्या.

14:47 (IST)14 Jul 2019
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची फलंदाजी

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोनही संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

14:32 (IST)14 Jul 2019
रात्रभर पडलेल्या पावसामुळे नाणेफेकीला विलंब

लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रचंड पाऊस पडला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे आता नाणेफेकीला विलंब झाला असून नाइफेक १५ मिनिटे उशिराने होणार आहे.

14:30 (IST)14 Jul 2019
क्रिकेटला मिळणार नवा विश्वविजेता!

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना होत आहे. या दोनही संघांकडे आतापर्यंत एकही विश्वचषक विजेतेपद नाही, त्यामुळे आज सामन्याचा निकाल आल्यानंतर क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे.