यजमान इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद २४१ धावा केल्या. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यापुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांना फारसे हात मोकळे करता आले नाहीत. इंग्लंडच्या फलंदाजांचीदेखील काहीशी तशीच अवस्था झालेली दिसली. न्यूझीलंडच्या वेगवान आणि मध्यमगती गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे फलंदाजही हतबल झालेले दिसले.

सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांकडून मोठ्या फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी तिवंचून मारा केल्याने इंग्लंड आवश्यक धावगतीपेक्षा मागे पडत चालली होती. त्यामुळे खूप वेळ सावध खेळ करणाऱ्या कर्णधार मॉर्गनला मोठा फटका मारण्याचा मोह आवरला नाही. उसळत्या चेंडूवर त्याने फटका खेळला आणि लॉकी फर्ग्युसनने त्याचा भन्नाट झेल टिपला. हवेत मारलेला चेंडू त्याने झेप घेऊन जमिनीच्या अगदी जवळ झेलला आणि मॉर्गनला २२ चेंडूत ९ धावांवर माघारी धाडले.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रचंड पाऊस पडला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे आता नाणेफेकीला विलंब झाला. पण अखेर नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी घेतली. स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी न करणारा सलामीवीर मार्टिन गप्टील स्वस्तात माघारी परतला. त्याने १८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार खेचत १९ धावा केल्या. इंग्लंडच्या भेदक वेगवान माऱ्यामुळे न्यूझीलंडने सावध पवित्रा स्वीकारत १४ व्या षटकात अर्धशतकी मजल मारली. अत्यंत शांत खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन झेलबाद होऊन माघारी परतला.

एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले, पण त्यानंतर ५५ धावांवर तो त्रिफळाचीत झाला. टॉम लॅथमने झुंजार खेळी करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचत ४७ धावा केल्या. बाकीच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.