इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद २४१ धावा केल्या. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यापुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांना फारसे हात मोकळे करता आले नाहीत. सलामीवीर निकोल्सचे केलेले अर्धशतक (५५) आणि टॉम लॅथमच्या झुंजार ४७ धावा यांच्या बळावर न्यूझीलंडने इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान दिले. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट यांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले. या डावात जॉनी बेअरस्टो याने अप्रतिम क्षेत्ररक्षण करून सर्वांची वाहवा मिळवली.

२० व्या षटकाचा पहिला मार्क वूडने टाकला. तो चेंडू विल्यमसनने अत्यंत चतुराईने टोलवला. हा चेंडू सीमारेषेला जाऊन धडकणार इतक्यात जॉनी बेअरस्टोने अत्यंत चपळाईने तो चेंडू सीमारेषेच्या आत रोखला. त्याने चेंडू अडवताना घेतलेली धाव पाहून तो चेंडू त्याला अडवता येणार नाही, असे वाटले होते. पण त्याने अत्यंत जलदगतीने चेंडूवर झडप घातली आणि चेंडू सीमारेषेच्या आतच रोखला. त्याच्या या यशस्वी प्रयत्नाचे साऱ्यांनीच कौतुक केले.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रचंड पाऊस पडला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे आता नाणेफेकीला विलंब झाला. पण अखेर नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी घेतली. स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी न करणारा सलामीवीर मार्टिन गप्टील स्वस्तात माघारी परतला. त्याने १८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार खेचत १९ धावा केल्या. इंग्लंडच्या भेदक वेगवान माऱ्यामुळे न्यूझीलंडने सावध पवित्रा स्वीकारत १४ व्या षटकात अर्धशतकी मजल मारली. अत्यंत शांत खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन झेलबाद होऊन माघारी परतला. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते, पण DRS प्रणालीमध्ये तो बाद असल्याचे दिसून आले. त्यामुळे न्यूझीलंडला दुसरा धक्का बसला. विल्यमसनने ५३ चेंडूत २ चौकार लगावत ३० धावा केल्या.

एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले, पण त्यानंतर ५५ धावांवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने या खेळीत केवळ ४ चौकार लगावले. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर हा खराब पंचगिरीचा शिकार ठरला. त्याला पंचांनी पायचीत बाद ठरवले. बॉल ट्रॅकिंग प्रणालीमध्ये चेंडू स्टंपच्या वरून जात असल्याचे दिसून आले, पण सलामीवीर गप्टीलने रिव्ह्यू वाया घालवल्यामुळे न्यूझीलंडकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हता. त्यामुळे त्यांना DRS ची मदत घेता आली नाही. टेलरने ३१ चेंडूत १५ धावा केल्या. चांगला खेळ करण्याची अपेक्षा असलेला अष्टपैलू जिमी निशम मोठा फटका मारताना झेलबाद झाला. २५ चेंडूत ३ चौकारांसह त्याने १९ धावा केल्या. टॉम लॅथमने झुंजार खेळी करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचत ४७ धावा केल्या.