इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मार्टिन गप्टील, केन विल्यमसन, रॉस टेलर यांसारख्या दमदार फलंदाजीच्या फळीला इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी थोपवून ठेवले. त्यातच न्यूझीलंडचा अनुभवी धोकादायक फलंदाज रॉस टेलर हा तर खराब आणि सुमार दर्जाच्या पंचगिरीचा बळी ठरला.

रॉस टेलर ३० चेंडूत १५ धावांवर खेळत होता. त्यावेळी तो खराब पंचगिरीचा शिकार ठरला. मार्क वूडने टाकलेला चेंडू टेलरच्या पायाला लागला. चेंडू पायाला लागताच इंग्लंडच्या खेळाडूंनी अपील केले. त्यामुळे त्याला पंचांनी पायचीत बाद ठरवले. बॉल ट्रॅकिंग प्रणालीमध्ये चेंडू स्टंपच्या वरून जात असल्याचे दिसून आले, पण सलामीवीर गप्टीलने रिव्ह्यू वाया घालवल्यामुळे न्यूझीलंडकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हता. त्यामुळे त्यांना DRS ची मदत घेता आली नाही.

दरम्यान, लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रचंड पाऊस पडला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे आता नाणेफेकीला विलंब झाला. पण अखेर नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी घेतली. स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी न करणारा सलामीवीर मार्टिन गप्टील स्वस्तात माघारी परतला. त्याने १८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार खेचत १९ धावा केल्या. इंग्लंडच्या भेदक वेगवान माऱ्यामुळे न्यूझीलंडने सावध पवित्रा स्वीकारत १४ व्या षटकात अर्धशतकी मजल मारली. अत्यंत शांत खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन झेलबाद होऊन माघारी परतला. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते, पण DRS प्रणालीमध्ये तो बाद असल्याचे दिसून आले. त्यामुळे न्यूझीलंडला दुसरा धक्का बसला. विल्यमसनने ५३ चेंडूत २ चौकार लगावत ३० धावा केल्या. एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले, पण त्यानंतर ५५ धावांवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने या खेळीत केवळ ४ चौकार लगावले.