बांगलादेशवरील विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. बुमराहने ४८ व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर बांगलादेशच्या दोन फलंदाजांना एकापाठोपाठ त्रिफळाचीत करत तंबूत धाडत भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केला. भारताने बांगलादेशवर २८ धावांनी विजय मिळवला. तर भारताने दिलेल्या ३१५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २८६ धावांवर आटोपला.  जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर पांड्याने ३ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. चहल, शमी आणि भुवीला प्रत्येकी एक बळी मिळाला.

तत्पुर्वी  सलामीवीर रोहित शर्माचे शानदान शतक (१०४), लोकश राहुलचे अर्धशतक (७७) आणि ऋषभ पंतच्या (४८) धावांच्या बळावर भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी ३१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. एकवेळ रोहित शर्मा आणि लोकश राहुल खेळपट्टीवर असताना भारत यापेक्षाही मोठी धावसंख्या उभारेल असे वाटले होते. पण रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मोठी भागीदारी होऊ शकली नाही.  भारताच्या मधल्या फळीचे अपयश आज पुन्हा जाणवले. रोहितने मोठया धावसंख्येचा पाया रचला होता. पण अन्य फलंदाजांना त्यावर कळस चढवता आला नाही. मुस्ताफिझूर रहमानच्या बांगलादेशकडून यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकात ५९ धावांमध्ये भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आजच्या सामन्यात दोन बदल केले होते. कुलदीप यादव आणि केदार जाधवला संघातून वगळण्यात आले व त्यांच्या जागी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिकला संधी दिली होती. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कुलदीप महागडा गोलंदाज ठरला होता. त्यामुळे त्याच्या जागी भुवनेश्वरला संधी देण्यात आली होती.