इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर संघ व्यवस्थापनाला काही निर्णय घेणे भाग पडू शकते. गोलंदाजी असेल किंवा फलंदाजीची क्रमवारी असेल बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या सामन्यात यात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात. बांगलादेश विरूद्धचा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहेच. या सामन्यात भारताला विजय मिळल्यास भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. या सामन्यातील काही महत्त्वाच्या लढती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रोहित शर्मा विरुद्ध मुस्तफिजूर रहमान –
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा हा सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. तसेच तो बांगलादेशविरोधातही आपला फॉर्म कायम ठेवेल अशीच अपेक्षा आहे. परंतु डावखुरा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान हा रोहित शर्माची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शर्मालाही सावध राहून पॉवरप्लेदरम्यान उत्तम खेळाचं प्रदर्शन करावं लागणार आहे.

विराट कोहली विरुद्ध शाकिब अल हसन –
बांगलादेशच्या शाकिब अल हसनसमोर भारताचा कर्णधार विराट कोहलीचे तगडे आव्हान असणार आहे. विश्वचषकात शाकिबची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्यामुळे भारताविरूद्धच्या सामन्यात शाकिबला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवण्याचे आव्हान असेल.  तसेच कोहलीच्या फटकेबाजीपुढे शाकिबला आपला उत्तम खेळ दाखवावा लागणार आहे. तर दुसरीकडे कोहलीचादेखील विश्वचषकातील फॉर्म उत्तम आहे. त्यामुळे शाकिबच्या गोलंदाजीलाही कोहलीला आपल्या बॅटने उत्तर द्यावे लागणार आहे.

तमीम इक्बाल विरुद्ध मोहम्मद शमी
तीन सामन्यांमध्ये 13 विकेट घेऊन शमीने आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला आहेच. नव्या चेंडूसोबतही शमीची कामगिरी उत्तमच राहिली आहे. त्यामुळे बांगलादेशपुढे शमी या वादळाचे तगडे आव्हान असेल. तर तमीम इक्बाल हा बांगलादेशच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे फलंदाजी करताना शमीसारख्या एका तगड्या गोलंदाजाचं आव्हान त्याच्यापुढे असेल.

जसप्रित बुमरा विरुद्ध मुश्फिकुर रहीम –
विश्वचषकात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जसप्रित बुमराने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. त्यातच भारतीय संघाचा महत्त्वाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. तर दुसरीकडे मुश्फिकुर रहीम हा बांगलादेशच्या मधल्या फळीतील उत्तम फलंदाज आहे. एकीकडे बुमराच्या खांद्यावर लवकरात लवकर बांगलादेशच्या संघाला माघारी धाडण्याचे आव्हान असेल, तर रहीमच्या खांद्यावर बांगलादेशचे पहिले फलंदाज लवकर बाद झाल्यास मधल्या फळीतील जबाबदारी सांभाळण्याचं आव्हान असणार आहे.

मेहदी हसन विरुद्ध महेंद्रसिंग धोनी
गेल्या काही सामन्यांपासून वातावरण हे महेंद्रसिंग धोनीच्या विरोधात जाताना दिसत आहे. तसेच त्याला फिरकीपटूंचा सामना करण्यातही अनेक अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे धोनी फलंदाजीला उतरल्यास बांगलादेशचा कर्णधार फिरकीपटूंची मदत घेऊ शकतो.  त्यामुळे धोनी आता आपल्या बॅटने फिरकीपटूंना कसं उत्तर देतो हे पहावं लागणार आहे.