विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका भारताला बसला आणि भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. २४० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २२१ धावांवरच आटोपला. रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी सामना भारताच्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. यानंतर पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना उधाण आले. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने महत्वाचे विधान केले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची अवस्था सुरुवातीला अत्यंत बिकट झाली. त्या सामन्यात धोनी भारतीय संघात नसता, तर चाहत्यांना भारत जिंकेल अशी जराही आशा वाटली नसती. धोनी संघात होता, म्हणून चाहत्यांनी सामना शेवटपर्यंत पाहिला. पण धोनी नसता, तर भारताला सामना जिंकण्याची संधीही उपलब्ध झाली नसती, असे मत स्टीव्ह वॉ याने व्यक्त केले.

पुढे बोलताना तो म्हणाला की तुम्ही प्रत्येकच सामना जिंकू शकत नाही. धोनी सामना जिंकवू शकला असता, पण त्या एका सामान्यपुरता धाव घेताना तो धावबाद झाला. त्याची बॅट क्रीजपासून काही इंच कमी राहिली. आव्हानाचा पाठलाग करताना धावा काढणे किती अवघड असते, ते मला माहिती आहे. त्यात तो एकदिवसीय सामना असेल तर त्याचे दडपण अधिक असते. पण तरीदेखील क्रिकेटच्या इतिहासात धोनीने इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त चांगली कामगिरी केली.

‘…म्हणून धोनीला ७व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं!’

दरम्यान, धोनीला उपांत्य फेरीच्या सामन्यात ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. भारतीय संघाची परिस्थिती बिकट असतानाही त्याने अर्धशतकी खेळी केली. पण दुर्दैवाने धोनी धावचीत झाला आणि भारताचे विश्वचषकाचे स्वप्न भंगले.