टीम इंडियाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फटका भारताला बसला आणि भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. २४० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २२१ धावांवरच आटोपला. रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी उत्तम खेळ करून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण मोक्याच्या क्षणी दोघेही तंबूत परतल्यानंतर भारताला अखेर पराभूत व्हावे लागले.

या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी याच्या फलंदाजीच्या क्रमांकावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. भारतीय संघाची अवस्था ४ बाद २४ असताना धोनीसारखा अनुभवी खेळाडू तंबूत बसवून हार्दिक पांड्याला फलंदाजीसाठी पाठवले. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी याबाबत संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर, भारत अरुण यांना जबाबदार धरले. याबाबत अखेर रवी शास्त्री यांनी मौन सोडले आहे.

“तो पूर्णपणे संघाचा निर्णय होता. सगळ्यांना तो निर्णय मान्य होता आणि महत्वाचे म्हणजे तो निर्णय हा अत्यंत सरळ आणि सोपा होता. धोनी हा उत्तम फिनिशर आहे. सामना शेवटपर्यंत गेला तरी धोनी दडपणाचा स्थितीत सामना जिंकवून देऊ शकतो हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. भारतीय संघ तेव्हा ज्या स्थितीत होता, त्यावेळी धोनीच्या त्या कौशल्याचा उपयोग करणे हेच महत्वाचे होते. धोनीच्या त्या प्रतिभेचा वापर करता आला नसता, तर ते चुकीचे ठरले असते. कारण धोनीला लवकर फलंदाजीसाठी पाठवून जर तो बाद झाला असता, तर भारताकडे त्याचा इतका अनुभवी खेळाडू नव्हता. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी त्याला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला”, असे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले.