भारतीय संघाचा विश्वचषक स्पर्धा २०१९ मधील उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव झाला. सामन्यात न्यूझीलंडने भारताला २४० धावांचे माफक आव्हान दिले होते, पण हे आव्हान भारतीय फलंदाजांना पेलता आले नाही. रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली आणि दिनेश कार्तिक हे ४ अनुभवी खेळाडू स्वस्तात तंबूत परतले. ४ बाद २४ या धक्क्यातून जाडेजा आणि धोनी यांनी भारताला सावरण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. या पराभवनानंतर भारतीय चाहते आणि क्रिकेट जाणकार यांनी आपली मते व्यक्त केली. त्यातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यानेही भारताच्या कामगिरीवर टीका केली.

“भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारण्याइतकी चांगली फलंदाजी अजिबात केली नाही. जाडेजा आणि धोनी या दोघांनी भारताच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सामना जवळपास भारताच्या बाजूने झुकवलाच होता. पण विश्वचषकाने एक धक्कादायक निकाल पाहिला, न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचला आणि भारत स्पर्धेबाहेर फेकला गेला”, अशा शब्दात ट्विट करत अख्तरने भारताच्या कामगिरीवर भाष्य केले.

दरम्यान, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर केन विल्यमसनच्या २०१९ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात केली. भारताचा संघ २२१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. २४० धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव कोलमडला.

रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी सातव्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी रचत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र अखेरच्या षटकात झटपट धावा करणं भारतीय फलंदाजांना जमलं नाही. रविंद्र जाडेजा आणि धोनीच्या मोक्याच्या क्षणी माघारी परतल्यामुळे भारताचा संघ बॅकफूटला ढकलला गेला. रविंद्र जाडेजाने ७७ तर धोनीने ५० धावा केल्या. या पराभवासह भारताचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ३, मिचेल सँटनरने-ट्रेंट बोल्टने २-२ तर फर्ग्युसन आणि निशमने १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.