विश्वचषक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर ८९ धावांनी मात केली. भारताने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानपुढे ३३७ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था ३५ षटकात ६ बाद १६६ अशी झाली होती. ३५ व्या षटकानंतर पाऊस पडल्यामुळे हे आव्हान डकवर्थ लुईस नियमानुसार उर्वरित ५ षटकात १३६ धावा अशा स्वरूपाचे करण्यात आले. हे आव्हान पाकिस्तानला पेलले नाही.

हे वाचा – IND vs PAK : “शिव्या देऊ नका”; हतबल आमिरची चाहत्यांना विनंती

भारतीय संघाकडून पाकच्या संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. भारताविरुद्धची पाकिस्तानी खेळाडूंची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची होती. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत पाकच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतर फलंदाजीतही पाकला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या संघावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या टीकेनंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने खेळाडूंना खेळ सुधारण्याची ताकीद दिल्याचे समजले होते. तशातच पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (PCB) सर्फराझला फोन करून दिलासा देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचा – IND vs PAK : “कामगिरी सुधारा! पाकिस्तानात मी एकटाच परतणार नाहीये”; सर्फराज भडकला

PCB चे अध्यक्ष एहसान मणी यांनी पाकिस्तानमधील मीडिया आउटलेट असलेले न्यूज.कॉम.पीके यांच्या वृत्तानुसार कर्णधार सर्फराझला फोन केला होता. त्यांनी या संवादादरम्यान सर्फराझला सांगितले की आतापर्यंत पाक संघाची झालेली कामगिरी समाधानकारक नसली, तरीही संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. सर्व चाहत्यांना तुमच्याकडून चांगल्या आणि सुधारित खेळाची अपेक्षा आहे. त्यामुळे पेरलेल्या, निराधार किंवा तथ्यहीन बातम्यांकडे दुर्लक्ष करा आणि केवळ खेळावर लक्ष केंद्रित करा.

हे वाचा – Viral Video : ‘प्लिज, आऊट हो’; कॅप्टन कोहलीपुढे इमादने जोडले हात

या आधी प्रसारमाध्यमात सर्फराज याने खेळाडूंना खेळ सुधारण्याची ताकीद दिली असल्याचीही बातमी आली होती. खेळाडूंनी आपला विश्वचषक स्पर्धेतील खेळ सुधारायला हवा. कारण स्पर्धेनंतर मी एकटाच मायदेशी परत जाणार नाहीये. माझ्याबरोबर पूर्ण संघ असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांचे शिव्या शाप आणि त्यांच्या रोषाला केवळ मला एकट्याला सामोरे जावे लागणार नसून साऱ्यांनाच ते सोसावे लागणार आहे. जर तसे करायचे नसेल, तर आताच खेळ सुधारा आणि चांगली कामगिरी करून दाखवा, अशी ताकीद त्याने पाकच्या खेळाडूंना दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानचे सध्या ५ सामन्यात १ विजयासह ३ गुण आहेत. पाक गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. अद्याप पाकिस्तानचे ४ सामने शिल्लक असून उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तानला अत्युच्च दर्जाची कामगिरी लागणार आहे.