सलामीवीर रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. २२८ धावांचं लक्ष्य भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा आफ्रिकेचा निर्णय पुरता फसला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा संघ २२७ धावांमध्ये आटोपला.

अवश्य वाचा – Video : जेव्हा चहल आफ्रिकेच्या फलंदाजाला मामा बनवतो

फिरकीपटू युजवेंद्र चहलने आफ्रिकेच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. युजवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकन कर्णधार फाफ डु प्लेसिस, वॅन डर डसन, डेव्हिड मिलर आणि फेलुक्वायो यांना माघारी धाडलं. युजवेंद्र चहलची ही कामगिरी पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजांमधली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. चहलने आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ३२ धावांत ४ बळी घेतले. त्याने मोहम्मद शमीचा ३५ धावांत ४ बळी घेण्याचा विक्रम मोडला.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाची या स्पर्धेतली सुरुवात अतिशय चिंताजनक झाली आहे. सलामीच्या सामन्यात इंग्लंड, त्यानंतर बांगलादेश आणि भारत या तिन्ही संघांकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आफ्रिकेला पुढील सर्व सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

अवश्य वाचा – आम्ही सारखी सारखी दया दाखवत नाही, क्विंटन डी-कॉक बाद झाल्यानंतर सेहवागचं खोचक ट्विट