विश्वचषकाचा पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून मात केली. सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यात नाबाद शतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र कालच्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपल्या अनोख्या कृतीमुळे सर्वांची मनं जिंकून घेतली.

अवश्य वाचा – World Cup 2019 : रोहितची आतापर्यंत सर्वोत्तम खेळी, कर्णधार विराट कोहलीकडून कौतुक

महेंद्रसिंह धोनीने आपल्या यष्टीरक्षक ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह लावलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे हे चिन्ह कोणालाही वापरण्याची परवानगी नाहीये. या चिन्हाला ‘बलिदान चिन्ह’ असं म्हटलं जातं, पॅरा कमांडोजच्या सदस्यांना हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते.

काय आहे ‘बलिदान चिन्ह’??

पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे हे विशेष बलिदान चिन्ह असतं. या चिन्हावर देवनागरी लिपीमध्ये ‘बलिदान’ असं लिहीलेलं असतं हे चिन्ह चांदीपासून बनवलेलं असतं. या चिन्हावर लाल रंगाच्या प्लास्टिकचं आवरणंही असतं.

अवश्य वाचा – Cricket World Cup 2019 : भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’ला मागे टाकत रोहित शर्माचा भीमपराक्रम !

२०११ साली महेंद्रसिंह धोनीला भारतीय लष्करातर्फे मानाची लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल करण्यात आली होती. धोनीने यासोबत पॅराट्रूपिंगचंही प्रशिक्षण घेतलं आहे. धोनी भारतीय सैनाच्या १०६ पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. २०१५ साली प्रशिक्षण घेऊन धोनी पारंगत पॅराट्रूपर बनला होता. भारतीय वायूसेनेच्या एएन-३२ विमानांमधून पाचवेळा उडी मारल्यानंतर सैनिकाचं पॅराट्रूपिंगचं प्रशिक्षण पूर्ण होतं. म्हणूनच आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनी हे विशेष बलिदान चिन्ह असलेलं ग्लोव्ह्ज घालून मैदानात उतरला होता.