19 September 2020

News Flash

World Cup 2019 : अफगाणिस्तानवर विजय मिळवत भारताने केला हा विक्रम

असा पराक्रम करणारा भारत जगातील केवळ तिसरा देश

World Cup 2019 IND vs AFG : अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने दडपणाखाली चांगली कामगिरी करत विजयाचा चौकार लगावला. भारताने प्रथम फलंदाजी करत २२४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद शमीच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने हा विजय संपादन केला. मोहम्मद नबीने अर्धशतक करत चांगली झुंज दिली. पण त्याची झुंज अयशस्वी ठरली.

भारताचा हा विश्वचषक स्पर्धेतील ५० वा विजय ठरला. अशी कामगिरी करणारा भारत जगातील केवळ तिसरा देश ठरला. या यादीत ऑस्ट्रेलिया अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण ६७ विश्वचषक सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत ५२ विश्वचषक सामन्यात विजय प्राप्त केला आहे. यानंतर आज भारताने ५०वा विजय संपादन केला आणि विक्रमी विजयाची नोंद केली.

दरम्यान, २२५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डावखुरा फलंदाज हजरतुल्लाह त्रिफळाचीत झाला. जायबंदी भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद शमीने त्याला बाद केले. हजरतुल्लाहने २४ चेंडूत १० धावा केल्या. पाठोपाठ हार्दिक पांड्याने टाकलेल्या बाउन्सर चेंडूवर गुलबदिन झेलबाद झाला. त्याने ४२ चेंडूत २ चौकारांसह २७ धावा केल्या. ४२ धावांची आश्वासक भागीदारी करणारे अफगाणिस्तानचे दोनही फलंदाज बुमराहच्या निर्धाव षटकात बाद झाले. चौथ्या चेंडूवर रहमत शाह ३६ धावांवर बाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर हाशमतुल्लाह शाहिदी बुमराहकडेच झेल देऊन २१ धावांवर माघारी गेला. छोटया भागीदारीनंतर असगर अफगाण माघारी परतला. युजवेंद्र चहलने त्याचा अडसर दूर केला.

नजीबुल्लाह झादरानने नबीबरोबर चांगली भागीदारी केली. पण शांत आणि संयमी फलंदाजी करणारा नजीबुल्लाह हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २१ धावा केल्या. रशीद खानदेखील १४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मोहम्मद शमीने हॅटट्रिक घेत अफगाणिस्तानचा डाव गुंडाळला. शमीने ४ तर बुमराह, चहल आणि पांड्याने २-२ गडी टिपले.

त्याआधी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेत दोन शतके ठोकणारा रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध स्वस्तात माघारी परतला. मुजीब उर रहमानने त्याला त्रिफळाचीत करत एका धावेवर माघारी धाडले आणि भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. सलामीवीर लोकेश राहुल याने चांगली खेळी केली पण रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ३० धावा केल्या. या दरम्यान दमदार कामगिरी करत कर्णधार विराट कोहलीने ४८ चेंडूत अर्धशतक झळकावले.

चांगली सुरुवात मिळल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात विजय शंकर अपयशी ठरला. ४१ चेंडूत २९ धावा करून तो रहमत शाहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. दमदार अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली ६३ चेंडूत ६७ धावा करून माघारी गेला. विराटने ५ चौकार लगावले. मोहम्मद नबीला दुसरा बळी मिळाला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी अत्यंत संथ खेळी केली. शेवटच्या टप्प्यात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात धोनी माघारी परतला. धोनीने ३ चौकारांसह ५२ चेंडूत २८ धावा केल्या. केदार जाधवने संयमी अर्धशतक केले. पण तो देखील ६८ चेंडूत ५२ धावा काढून बाद झाला. अफगाणिस्तानकडून नबी, नैब यांनी २-२ तर मुजीब, आलम, रहमत शाह आणि रशीद खान यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 11:59 pm

Web Title: icc cricket world cup 2019 india beat afghanistan to register 50th world cup win vjb 91
Next Stories
1 Video : अशी घेतली शमीने दमदार हॅटट्रिक
2 World Cup 2019 : मोहम्मद शमी चमकला, विश्वचषकात हॅटट्रीक नोंदवणारा पहिला गोलंदाज
3 Video : बुमराहने घेतलेला भन्नाट झेल एकदा पहाच
Just Now!
X