विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत न्यूझीलंडने भारताला १८ धावांनी पराभूत केले. या पराजयासह भारताचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळाले. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. साखळी फेरीतील ९ सामन्यांपैकी ७ सामने जिंकून भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होता. परंतु स्पर्धेतील ‘डार्क हॉर्स’ समजल्या जाणाऱ्या न्यूझीलंडने विश्वचषकाचे सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताला अनपेक्षित धक्का देत स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. जाणून घेऊया काय आहेत भारतीय संघाच्या पराभवाची कारणे..

पहिल्या तीन फलंदाजांचे अपयश

या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी कमालीची कामगीरी केली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल हे तिघेही जबरदस्त फॉर्मात होते. रोहित शर्माने या स्पर्धेत ५ शतकांसह सर्वाधीक ६४७ धावा केल्या. विराट कोहलीने ५ अर्धशतकांसह ४४२ धावा केल्या. तर शिखर धवन ऐवजी खेळवण्यात आलेला सलामीवीर लोकेश राहुलने ३६० धावा करत संघाला अनेक सामन्यांत अपेक्षित सुरुवात करून दिली. त्यामुळे उपांत्यफेरीतही या तिघांकडून नेहमीप्रमाणेच दमदार कामगिरीची अपेक्षा होती. परंतु न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर यांचा टिकाव लागला नाही आणि भारताची ५ धावांवर ३ बाद अशी केवीलवाणी अवस्था झाली. तेथूनच भारताच्या पराभवाची सुरुवात झाली.

चौथ्या क्रमांकाचे न उलगडलेले कोडे

भारताने गेल्या चार वर्षांत जे एकदिवसीय सामने जिंकले त्या सर्वांमध्ये पहिल्या तीन फलंदाजांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिलेला आहे. पहिल्या तिघांपैकी एक फलंदाज भारत जिंकेपर्यंत फलंदाजी करत होता त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांना जबाबदारी घेऊन फलंदाजी करण्याची कधी गरजच पडली नाही. भारतीय फलंदाजीच्या या बदललेल्या शैलीचे जगभरातून कौतुक केले जात होते. परंतु हिच शैली भारताला मारक ठरली. कारण गेल्या चार वर्षात संघाला युवराज सिंगसारखा जबाबदारीने खेळणारा फलंदाज सापडलाच नाही. अगदी विश्वचषक उंबरठ्यावर आला असतानाही चौथ्या क्रमांवर खेळणाऱ्या फलंदाजाचा शोध सुरुच राहिला. या स्पर्धेत ही जबाबदारी विजय शंकर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, ऋषभ पंतवर सोपवण्यात आली होती. परंतु यापैकी कोणालाही पहिले तीन विकेट्स स्वस्तात बाद झाल्यानंतर खेळ सावरण्याचा अनुभव नसल्यामुळे कोणालाही आश्वासक खेळी साकारता आली नाही. याचाच परिणाम आपण न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पाहिला. भारताच्या मधल्या फळीचे अपयश हे पराभवाचे दुसरे कारण होते.

ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टरची खेळपट्टी

उपांत्यफेरीचा सामना पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे दोन दिवसांमध्ये खेळला गेला. परंतु या दोन दिवसांत ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टरच्या खेळपट्टीने रंग बदलले. न्यूझीलंड फलंदाजी करत असताना सुरवातील खेळपट्टीचा वेग सामान्य होता. परंतु जस जसा सामना पुढे सरकत गेला खेळपट्टीचा वेग कमी होत गेला. त्यानंतर अखेरच्या काही षटकात पाऊस पडल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पावसामुळे खेळपट्टी झाकण्यात आली. परंतु या प्रक्रियेत खेळपट्टीचा वेग पहिल्या दिवसाच्या तुलनेत आणखी कमी झाला. त्यामुळे भारतीय संघ फलंदाजी करत असताना बॉल बॅटवर व्यवस्थित येत नव्हता. फलंदाजांना फटके मारण्यात अडचणी येत होत्या. त्यातच ढगाळ वातावरणामुळे बॉलचे स्विंग होण्याचे प्रमाण वाढले. रोहित शर्मा व विराट कोहली या दोन आघाडीच्या फलंजांमध्ये प्रतिकुल परिस्थितीतही धावा करण्याची क्षमता होती. परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी तशी संधीच दिली नाही. न्यूझीलंडची सामान्य वाटणारी गोलंदाजी दुसऱ्या दिवशी आणखीन भेदक झाली. परिणामी भारताने सामना गमावला.

पहिली ४५ मिनिटे

बॉक्सिंग खेळताना असे म्हटले जाते की पहिला हल्ला नेहमी आपणच कारावा. तसे केल्यास आपला आत्मविश्वास व्दिगुणीत होतो व जिंकण्याची शक्यता वाढते. असाच काहीसा प्रकार न्यूझीलंडने गोलंदाजी करताना केला. त्यांनी गोलंदाजी करताना पहिल्या ४५ मिनिटांत जबरदस्त हल्ला चढवला. हा हल्ला इतका भेदक होता की अखेरपर्यंत भारतीय संघ त्यातून सावरलाच नाही. त्यांनी पहिल्या ४५ मिनिटांत अचूक गोलंदाजी व जीव तोडून क्षेत्ररक्षण केले. भारतीय फलंदाजांना एक – एक धाव काढण्यासाठी जणू जिवाच्या आकांताने पळावे लागत होते. या सर्व प्रकारामुळे भारताचा आत्मविश्वास खालावला आणि आपण सामना गमावला.