अत्यंत थरारक पद्धतीने सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

विल्यमसन आणि त्याच्या न्यूझीलंड संघाने विश्वचषक गमावला, पण त्यांनी साऱ्यांची मनं जिंकली. याचबरोबर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने एक विक्रम केला. विल्यमसनने विश्वचषक स्पर्धेत एकूण ५७८ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे आणि त्याच्या नेतृत्व कौशल्याच्या बळावर त्याला स्पर्धेच्या मालिकावीराचा किताब प्रदान करण्यात आला. विश्वचषक स्पर्धेचा मालिकावीर म्हणून गौरविण्यात आलेला तो केवळ दुसरा कर्णधार ठरला. या आधी न्यूझीलंडचे दिवंगत माजी कर्णधार मार्टिन क्रोव्ह यांनी १९९२ साली हा पराक्रम केला होता.

दरम्यान, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.